नांदेड: काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंब आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यात निर्माण झालेला दुरावा चर्चेअंती संपुष्टात आल्यामुळे काँग्रेस पक्षातील पेच स्थानिक पातळीवर सुटला आहे.

भास्करराव खतगावकर, त्यांच्या स्नुषा डॉ. मीनल आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी गेल्या महिन्यात मुंबईमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तत्पूर्वी त्यांच्या काँग्रेस प्रवेशाला नायगावमधील चव्हाण गटाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विरोध दर्शविल्यामुळे खतगावकर व चव्हाण कुटुंब यांच्यात नातेसंबंध असूनही कटुता आली होती.

हेही वाचा – चंद्रपूरसाठी भेटीगाठींना जोर

खतगावकर यांच्या पक्ष प्रवेशापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (कै.) वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली होती, पण या चर्चेवर चव्हाण यांचे समर्थक-कार्यकर्ते समाधानी नव्हते. त्यामुळे खतगावकर यांचा पक्षप्रवेश झाल्यावरही तब्बल दोन आठवडे येथे अनिश्चितता आणि अस्वस्थता जाणवत होती. पण गेल्या आठवड्यात खतगावकर यांनी नायगावला जाऊन प्रा. रवींद्र आणि चव्हाण कुटुंबातील प्रमुख सदस्यांशी एका बैठकीत चर्चा केल्यानंतर दोन कुटुंबांतील दुरावा संपुष्टात आल्याचे सांगितले जात आहे.

या दोन कुटुंबांतील वादाचा विषय काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्यापर्यंत गेला होता. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या हितासाठी चव्हाण परिवार व खतगावकर यांनी एकत्र येऊन काम करावे, असा सल्ला देशमुख यांनी दिला होता. त्यानंतर चव्हाण परिवार आणि खतगावकर यांची बैठक पार पडली.
विधानसभा निवडणुकीत खतगावकर यांच्या स्नुषा डॉ. मीनल पाटील यांना नायगाव मतदारसंघात उभे करण्याचा निर्णय खतगावकर समर्थकांनी गेल्या महिन्यातच घेतला होता. पण त्यांच्या या निर्णयानंतर चव्हाण कुटुंबातील दोन सदस्यांनी आम्ही नायगावमध्ये निवडणूक लढविणार, असे जाहीर केल्यामुळे काँग्रेस पक्षातील पेच उघड झाला होता.

हेही वाचा – रायगडमध्ये महिला मतांसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी

विधानसभेसोबत नांदेडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होणार असून काँग्रेस पक्षातर्फे रवींद्र चव्हाण यांचे एकमेव नाव उमेदवारीसाठी प्रस्तावित झाले असून या निवडणुकीत त्यांच्यामागे आपले संपूर्ण बळ उभे करण्याची तयारी खतगावकर गटाने दाखविली आहे. वसंतरावांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाकडे नेतृत्वच शिल्लक राहिले नव्हते. पण खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे ती जागा भरली गेल्याचे मानले जात आहे. त्यांनी चव्हाण कुटुंबाची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर पक्षातील बरेच पेच निकाली निघाले. त्यानंतर दोन कुटुंबातील दिलजमाईला आपल्या समर्थकांचीही मान्यता मिळावी, यासाठी चव्हाण कुटुंबाने आता पुढचे पाऊल टाकले आहे.