पुणे : महायुतीच्या जागा वाटपामध्ये वडगाव शेरी मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला देण्याचा निर्णय झाल्यानंतर देखील भाजपने येथून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. याला शह देण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने आता खडकवासला मतदारसंघातून उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू केली आहे. माजी महापौर दत्तात्रय धनकवडे खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. ही मैत्रीपूर्ण लढत असल्याची चर्चा आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुका महायुतीच्या माध्यमातून एकत्रित लढविण्याचा निर्णय भाजप, शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने घेतला आहे. पुण्यातील आठ विधानसभा मतदासंघांपैकी कोथरूड, शिवाजीनगर, कसबा पेठ, पुणे कॅन्टोन्मेंट, पर्वती आणि खडकवासला या सहा जागा भाजप तर वडगाव शेरी, हडपसर या दोन जागा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष लढविणार आहे. सहा जागांवर भाजपच्या उमेदवारांना संधी मिळालेली असतानाही वडगाव शेरी मतदारसंघाची जागा भाजपला द्यावी अशी मागणी केली जात आहे. येथून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र त्यानंतर देखील भाजपचे माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे.
हेही वाचा – Sangli Assembly Constituency : सांगलीत अजून एका घराण्यात दुहीची बिजे
पक्षाने आदेश दिल्यानंतर या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचा पवित्रा मुळीक यांनी घेतला आहे. वडगाव शेरीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाल्यानंतर देखील या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचा आपला दावा मुळीक यांनी कायम ठेवला आहे. तसेच त्यावर भाजपचा कोणताही नेता चकार शब्दही काढत नसल्याने आता भाजपच्या खडकवासला मतदारसंघातून उमेदवार देण्याची तयारी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने केली आहे. माजी महापौर दत्तात्रय धनकवडे खडकवासल्यातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यामुळे राज्यात हे तीनही पक्ष महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना पुण्यात मात्र या दोन मतदारसंघात महायुती तुटणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
खडकवासला मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तापकीर यांनी सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. असे असतानाही खडकवासला मतदारसंघातून दत्तात्रय धनकवडे यांनी अर्ज भरण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, भाजपचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलडाण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना एक-दोन जागांवर महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, असे सूतोवाच केले. त्यामुळे ही महायुतीतील मैत्रीपूर्ण लढत पुण्यातील वडगाव शेरी आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये तर होणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा – नाराजी : इकडे तिकडे चोहीकडे; चंद्रपूर जिल्ह्यात युती-आघाडीतील मित्रपक्षांत खदखद
खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) यांना मानणारा मतदार मोठा आहे. येथे पक्षाची ताकद अधिक आहे. त्यामुळे येथून निवडणूक लढविणार आहे. पक्षाचा अधिकृत ‘ एबी ‘ फॉर्म देखील मला दिलेला आहे. त्यानुसार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. – दत्तात्रय धनकवडे, इच्छुक उमेदवार, राष्ट्रवादी (अजित पवार)