मोहन अटाळकर
अमरावती : प्रभावक्षेत्र वाढावे या रस्सीखेचातून आमदार बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती आणि आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान या दोन सत्तारूढ आघाडीतील घटक पक्षांमध्ये सुंदोपसुंदी निर्माण झाली आहे. या आमदारद्वयांमधील संघर्ष नवा नसला, तरी लोकसभा निवडणुकीआधी तो पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार आहेत, तर रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे मानले जातात. नवनीत राणा या गेल्या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या असल्या, तरी त्यांनी मोदी सरकारला पाठिंबा दिलेला. आता त्या भाजपकडून पाठिंबा मिळावा, या प्रतीक्षेत असताना बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदार संघावर दावा सांगितला.
हेही वाचा >>> सोलापूरमध्ये सत्ताकेंद्र कायम ठेवून भाजपचे दोन आमदारांना पाठबळ
अमरावतीसह तीन लोकसभा मतदार संघ आमच्या पक्षाला मिळाले पाहिजेत, अमरावतीमधून जर नवनीत राणा आमच्या प्रहार पक्षाच्या तिकीटावर लढण्यास तयार असतील, तर आमची हरकत नाही, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले. त्यावर रवी राणा यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली. बच्चू कडूंनी नवनीत राणांना प्रहारची उमेदवारी देऊ केली, त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानतो, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही आमचे नेते मानतो. खासदार नवनीत राणा यांच्याबाबत ते योग्य वेळी निर्णय घेतील. बच्चू कडू खासदार नवनीत राणा यांना मदत करणार असतील तर आम्हीही त्यांना अचलपूर विधानसभा मतदारसंघात मदत करू. मात्र महायुतीचे पालन नाही केले तर तर त्याचे परिणामही भोगावे लागतील, असा इशारा रवी राणा यांनी दिला.
नवनीत राणा या हमखास जिंकून येणाऱ्या उमेदवार आहेत. अमरावती मतदारसंघात आज त्यांच्यासमोर निवडणूक लढविण्यासाठी एकही उमेदवार नाही. त्यामुळे त्या आपल्या पक्षात असाव्यात असे अनेक पक्षांना वाटते. मात्र बच्चू कडूंनी महायुती धर्म पाळावा, कुणी वाकड्यात शिरले, तर त्यांना सरळ करण्याची ताकद आमच्यात आहे, असे आव्हानही रवी राणांनी दिले.
प्रहारचे दुसरे आमदार राजकुमार पटेल हे आता वेगळ्या वाटेवर असल्याचे बच्चू कडू यांना व मलाही माहिती आहे. त्यांना भाजपची उमेदवारी हवी आहे. त्यांचा भाजपसह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडेही कल आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी कोणताही बदल होऊ शकतो, असा दावा रवी राणा यांनी केला. सर्वांनी आपापल्या लोकांना सांभाळून ठेवले पाहिजे. स्वतःची जागा राखून ठेवली पाहिजे. आपलीच जागा धोक्यात असेल तर आपण दुसऱ्यांचा विचार करू शकत नाही, असा इशारा देखील रवी राणांनी दिला.
हेही वाचा >>> शिरूरवर अजितदादांचा दावा, शिंदे गटही आग्रही; शनिवारी मुख्यमंत्री शिरूरमध्ये
राणा दाम्पत्याने अमरावतीत नुकतीच पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा केला. त्यांनी आपली ‘हिदुत्ववादी’ भूमिका याआधीच जाहीर केली आहे. गेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही नवनीत राणा या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. यावेळी मात्र त्यांना हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचा लाभ होईल, असे राणा समर्थकांचे म्हणणे आहे.
राणा दाम्पत्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर ‘हनुमान चालिसा’ प्रकरण गाजले. राणा दाम्पत्याने ‘तुरूंगवारी’चा विषय जिवंत ठेवला. पण, त्याचवेळी स्थानिक पातळीवर त्यांना विरोध वाढू लागल्याचेही चित्र दिसले.
ऑगस्ट २०२२ मध्ये दहीहंडी कार्यक्रमाच्या निमित्ताने बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात शाब्दिक चकमक पहायला मिळाली होती. हा वाद नंतर मिटला, पण धुसफूस कायम आहे. दोघेही मंत्रिपदाच्या शर्यतीत होते, पण दोघांनाही संधी मिळाली नाही. दोघांचे पक्ष सत्तारूढ आघाडीत असले, तरी पक्षविस्ताराची महत्वांकाक्षा हे नेते बाळगून आहेत. कुरघोडीच्या राजकारणातून कडू आणि राणांमध्ये उफाळून आलेला संघर्ष आता कोणत्या वळणावर पोहचणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.