लोकसत्ता प्रतिनिधी
राज्यात सुरू असलेल्या राजकारणाच्या विरुद्ध भूमिका घेणारे असा परिचय असलेल्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याने नुकत्याच झालेल्या जि.प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सत्तेसाठी सोयीच्या आघाड्या करून आघाडी-युती धर्म गुंडाळून ठेवला. गोंदिया जि.प.मध्ये राष्ट्रवादीने भाजपशी युतीकरून काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले तर भंडाऱ्यात काँग्रेसने भाजप बंडखोरांशी हातमिळवणी करून सत्ता मिळवली. विशेष म्हणजे भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र यावे असे निवेदन जारी केले होते. प्रत्यक्षात या निवेदनावर सह्या करणाऱ्या नेत्यांनीच वेगळी भूमिका घेतली. त्याचे पडसाद राज्याच्या राजकीय पटलावर उमटू लागले आहेत.
गोंदिया -भंडाऱ्यात जे घडले ते काँग्रेस नेते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल या दोन नेत्यांच्या व्यक्तिगत भांडणामुळे. पटेल यांना गोंदियात काँग्रेस वाढू द्यायची नाही तर भंडाऱ्यात पटोले यांना राष्ट्रवादी वाढू द्यायची नाही. त्यामुळे परस्परांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न या दोन नेत्यांचा असतो. हे करतानात ते आघाडीचा धर्म पाळत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी मात्र एकत्र येण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता. स्थानिक पातळीवर एकीचा संदेश जावा म्हणून एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले होते. त्यात पटोले (काँग्रे्स),जयंत पाटील (राष्ट्रवादी) आणि सुभाष देसाई (सेना) यांच्या स्वाक्षरी होत्या.
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील जि.प. अध्यक्ष निवडणुकी दरम्यान पटोले आणि पाटील या स्वाक्षरी करणाऱ्या दोन्ही नेत्यांनी निवेदनाला छेद देणाऱ्या भूमिका घेतल्या. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यात चुकाचा संदेश गेला आहे. नेतेच आघाडीबाबत गंभीर नसेल तर कार्यकर्त्यांनी काय करावे, असा सवाल केला जात आहे. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र राज्यपातळीवर निर्माण झाले आहे. या मुद्यावरून परस्परांवर टीका होऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसल्याची टीका पटोले यांनी केली तर पटोले यांनी त्यांचा राजकीय इतिहास तपासावा असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे. या दोन नेत्यांच्या भांडणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपने केला. मात्र यामुळे भंडारा जिल्हा भाजपमध्येच फूट पडली. भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटातील जि.प. सदस्यांनी वेगळी चूल मांडून काँग्रेसला मदत केली. वाघमारे यांच्या वेगळ्या भूमिकेमागे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्यासोबतचा वाद कारणीभूत आहे, असे मानले जाते. फुके हे फडणवीस समर्थक आहेत. भंडाऱ्याच्या राजकारणात त्यांना मोकळिक आहे. दुसरीकडे फडणवीस मुख्यमंत्री असताना वाघमारे यांनी मंत्रालयात उंदिर खुप झाल्याची टीका केली होती. यावरून एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांना लक्ष्य केले होते. हा राग फडणवीस यांच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वाघमारे यांना उमदेवारी नाकारण्यात आली. त्यामुळे वाघमारे पक्षावर नाराज होते. त्यामुळे संधी मिळताच त्यांनी वेगळी भूमिका घेत काँग्रेसला मदत केली त्यामुळे भाजपला ही धक्का बसला, अशी चर्चा आहे. अशा प्रकारे प्रत्येक पक्षात सोयीच्या भूमिका घेण्याचे प्रकार वाढू लागले आहे.
दुसरीकडे रोज राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोंड सुख घेणारे व हा पक्ष भ्रष्ट असल्याचा टाहो फोडणारे भाजपचे नेते सत्तासाठी राष्ट्रवादीची मदत घ्यायला तयार आहेत हे गोंदिया-भंडाऱ्यातील घटनेतून दिसून आल्याची टीका होते आहे. या निवडणुकीमुळे महाविकास आघाडीतील बिघाडी जशी स्पष्ट दिसून आली तसाच भाजपच्या राष्ट्रवादी विरोधाचा बुरखाही गळून पडला.
राष्ट्रवादीने पाठित खंजीर खुपसला
भंडारा जिल्हा परिषद व पंसायत समिती निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करून काँग्रेसच्या पाठित खंजीर खुपसला. विशेष म्हणजे या निवडणुकीबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा झाली होती. तरीही राष्ट्रवादीने भाजपशी युती केली.
नाना पटोले, अध्यक्ष प्रदेश काँग्रेस
बंडखोराशी चर्चा करण्यात अधिक रस
“भंडारा जि.प.अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने काँग्रेससोबत चर्चेची तयारी ठेवली होती. पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व अन्य नेत्यांना आमच्याऐवजी भाजप बंडखोराशी चर्चा करण्यात अधिक रस होता. त्यामुळे आम्ही गोंदियात भाजपसोबत युती केली“
राजेंद्र जैन, माजी आमदार, राष्ट्रवादी