शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतरच गेल्या दोन दिवसांतील चित्र. स्थ‌‌ळ मुंब्रा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांकडून घोषणाबाजी आणि काळे झेंडे दाखवून आंदोलन, दुसरे चित्र, स्थ‌ळ पुणे : शरद पवार आणि अजित पवार कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त एकत्र उपस्थित.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात टोकाची कटुता जाणवते. याउलट राष्ट्रवादीत बंडखोरांनी शरद पवारांची भेट घेणे, बंडखोर मंत्री पवारांच्या भेटीला जाणे, कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त पवार कुटुंबिय एकत्र येणे असेच चित्र गेल्या पाच महिन्यांत अनुभवास आले.

हेही वाचा : वाघनखांबाबत एवढी गुप्तता का ?

मुंब्र्यात ठाकरे गटाची शाखा पाडून टाकण्यात आली. याच्या निषेधार्थ शाखेला भेट देण्यासाठी शनिवारी उद्धव ठाकरे हे मुंब्र्यात आले होते. या वेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या विरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ठाकरे यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. शिंदे गटाने ठाकरे यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या बालेकिल्ल्यात ठाकरे यांची कोंडी करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न झाला. ठाकरे यांच्या भेटीच्या वेळी शिवसेनेच्या दोन गटांमध्ये जवळपास राडाच झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने दोन्ही गटांचे कार्यकर्ते भिडले नाहीत एवढेच.

हेही वाचा : Telangana Polls : मुख्यमंत्री केसीआर यांच्याविरोधात दोन मतदारसंघांत १०० हून अधिक उमेदवार निवडणुकीला उभे

शुक्रवारी पुण्यात राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. त्यांच्यात चर्चा झाली का, वगैरे याचा तपशील समजू शकलेला नाही. पण काका-पुतणे बराच वेळ एकत्र होते. तेथून अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला दिल्लीला रवाना झाले होते.

हेही वाचा : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची मनमानी वाढली ?

राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांनी शरद पवार यांना दिलेला निवृत्तीचा सल्ला किंवा छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्याकडून पवारांना करण्यात आलेले लक्ष्य वगळता दोन्ही गटांमध्ये शिवसेनेच्या धर्तीवर कटुता किंवा टोकाचा विरोध दिसत नाही. कायदेशीर लढाईत दोन्ही बाजू परस्परांवर शरसंघान करीत आहेत. पण अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या बंडखोर मंत्री व आमदारांनी पवारांची भेट घेणे, काकींच्या प्रकृतीची पाहणी करण्याकरिता अजित पवार यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी भेट देणे, मध्यंतरी पुण्यात पवार काका-पुतण्याची झालेली भेट यावरून शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादीत अजून तरी सौहार्द कायम असल्याचे बघायला मिळते. शिवसेनेत मात्र नेमके उलटे चित्र आहे. उद्धव ठाकरे- आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. बेकायदा सरकार म्हणून सतत उल्लेख केला जातो. शिंदे गटाकडून ठाकरे गटाची पद्धतशीरपणे कोंडी केली जाते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute between two factions of shiv sena and friendly relations between two factions of ncp print politics news css
Show comments