वणी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत तिढा कायम; उमेदवार जाहीर करून भाजपची प्रचारात आघाडी

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या वणी विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करून भाजपने आघाडी घेतली.

Dispute continues in Mahavikas Aghadi in Vani Assembly Constituency
वणी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत तिढा कायम; उमेदवार जाहीर करून भाजपची प्रचारात आघाडी (लोकसत्ता ग्राफिक टीम )

यवतमाळ – चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या वणी विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करून भाजपने आघाडी घेतली. महाविकास आघाडीत मात्र ही जागा कोणाला सोडायची याबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असून, इच्छुक उमेदवार हा तिढा कधी सुटणार, याची प्रतीक्षा करीत आहेत.

वणी विधानसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी उमेदवारी जाहीर केली. बोदकुरवार यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये येथे विजय मिळविला होता. पक्षाने तिसऱ्यांदा संधी दिल्याने यावेळी आपली विजयाची ‘हॅटट्रिक’ हाईल, असा विश्वास बोदकुरवार यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान महाविकास आघाडीत वणीच्या जागेवरून वाद सुरू आहे. काँग्रेस आणि शिवसेना उबाठा या दोन्ही पक्षांनी येथे दावा सांगितला आहे. या मतदारसंघात पूर्वीच्या निवडणुका हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले आहेत. यावेळी मात्र महाविकास आघाडी असल्याने बिघाडी झाली आहे. दिग्रस विधानसभा काँग्रेसला सुटणार की शिवसेना उबाठाला, यावर वणी विधानसभा मतदारसंघाचे भवितव्य अवलंबून असल्याचे सांगितले जाते. दिग्रस विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा गृह मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून मुलाला उमेदवारी मिळावी म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शिवसेना उबाठाने आपली ताकद असलेल्या वणी विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. मात्र येथे काँग्रेसने शिवसेना उबाठाला हा मतदारसंघ देण्यास तीव्र विरोध चालविला आहे.

हेही वाचा >>>मराठवाड्यातील सहा मतदारसंघांत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना

शिवसेना उबाठाकडून येथे संजय देरकर हे उमेदवारीसाठी इच्छुक आहे. देरकर हे सातत्याने पक्ष बदलतात, पक्षाने तिकीट नाकारली तर अपक्ष लढतात, अशी टीका करीत त्यांना पक्षांतर्गत आणि महाविकास आघाडीतच विरोध होत आहे. देरकर यांची नाळ अद्यापही शिवसैनिकांशी जुळली नसल्याचे शिवसैनिक सांगतात. त्यामुळे शिवसेना उबाठाचे उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी वणी विधानसभा लढण्याची तयारी चालविली आहे. शिवाय शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख, माजी आमदार विश्वास नांदेकर यांचीही येथून लढण्याची इच्छा आहे. परंतु, पक्ष त्यांना संधी देण्याची शक्यता नसल्याची चर्चा आहे.

हेही वाचा >>>उल्हासनगर भाजप आमदारावरील टांगती तलवार कायम

काँग्रेसने मात्र वणी विधानसभा मतदारसंघ आपल्यासाठीच सुटावा असा प्रयत्न चालविला आहे. काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार हे येथून इच्छुक आहे. मात्र यापूर्वी २०१४ आणि २०१९ मध्ये वामनराव कासावार या मतदारसंघात पराभूत झाले. काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून वणीतील उद्योजक, बँकर संजय खाडे हे प्रयत्नशील आहे. मात्र गेल्या १० वर्षांत या मतदारसंघावर भाजपने आपली पकड मजबूत केल्याने काँग्रेससमोर मोठे आव्हान आहे. वणी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेही वर्चस्व आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी वणी दौरा करून येथील आढावा घेतला. त्यानंतर मनसेचे नेते राजू उंबरकर हे येथे निवडणूक लढतील, असे जाहीर केले होते. त्यामुळे वणी विधानसभा निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी आणि मनसे या प्रमुख पक्षांची लढत होईल, असे चित्र सध्या आहे. वंचितसुद्धा वणी मतदारसंघात उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर वणीतील लढतीचे चित्रही अधिक स्पष्ट होईल. 

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dispute continues in mahavikas aghadi in vani assembly constituency print politics news amy

First published on: 22-10-2024 at 16:28 IST
Show comments