बुलढाणा : विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतर्फे जय्यत तयारी सुरू असून जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. बुलढाणा जिल्ह्यात निर्विवाद वर्चस्व असलेल्या महायुतीचे जागा वाटप जवळपास ठरल्यात जमा आहे. महाविकास आघाडीत मात्र जागा वाटपावरून अद्यापही पेच कायम आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१९ च्या लढतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकसंघ होती. तसेच भाजप-शिवसेना अशी युती होती, तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये सहभागी होती. त्या निवडणुकीत भाजपने चिखली, जळगाव आणि खामगावमध्ये बाजी मारली. शिवसेना बुलढाणा आणि मेहकरमध्ये विजयी झाली.

काँग्रेसला एकमेव मलकापूर तर राष्ट्रवादीला सिंदखेड राजामध्ये यश मिळाले होते. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी दुभंगली आहे. यामुळे जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचे काँग्रेसचे मनसुबे आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भात मोठे यश मिळाल्याने काँग्रेसचा उत्साह द्विगुणीत झाला आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Elections 2024 : चंद्रपूरमध्ये महिलांना संधी मिळणार का?

शिवसेना ठाकरे गटाने बुलढाणा, मेहकर आणि सिंदखेड राजा या मतदारसंघांवर दावा केला आहे. काँग्रेसने बुलढाणा, खामगाव, मलकापूर, चिखली आणि जळगाव जामोद या चार मतदारसंघांची मागणी केली आहे. एकसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या बुलढाणासाठी ठाकरे गट आणि काँग्रेस हे दोन्ही मित्र पक्ष आग्रही आहे. यामुळे शिवसेनेने दबावाचे राजकारण म्हणून चिखली मतदारसंघाचीदेखील मागणी केल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सिंदखेड राजा आणि जळगाव जामोद मतदारसंघांवर दावा केला आहे. जळगाव मतदारसंघातून काँग्रेसतर्फे लढण्यास इच्छुकांची संख्या २० वर पोहोचली आहे. मागील दोन दशकात या मतदारसंघावरील भाजपचे वर्चस्व मोडीत काढण्यात काँग्रेसला यश आले नाही. मात्र, काँग्रेस राष्ट्रवादीला ही जागा सोडण्यास तयार नाही, असे चित्र आहे. मेहकर या राखीव मतदारसंघासाठी ठाकरे गट आणि काँगेस आग्रही आहेत. यामुळे जागा वाटपावरून महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही प्रमुख पक्षांत चांगलीच जुंपल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Election 2024 : पुण्यात शिंदे यांच्या शिवसेनेला जागा सोडण्यास मित्रपक्षांचा विरोध

काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठीही चुरस

आघाडीमध्ये उमेदवारीसाठीही चुरस आहे. जळगावमध्ये तब्बल वीस नेते काँग्रेसची उमेदवारी मागत आहेत. खामगावमध्ये सेवादल जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, माजी आमदार दिलीप सानंदा, धनंजय देशमुख, गजानन पाटील, असे चार इच्छुक आहेत. मलकापूरमध्ये आमदार राजेश एकडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच हरीश रावळ, अरविंद कोलते हे देखील इच्छुक आहेत. चिखली या एकमेव मतदारसंघात जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे हेच इच्छुक आणि संभाव्य उमेदवार मानले जात आहेत

युतीत सर्वकाही आलबेल बुलढाणा जिल्ह्यातील सातपैकी तब्बल सहा आमदार महायुतीचे आहे. महायुतीचे जागा वाटप आणि उमेदवारदेखील ठरल्यात जमा आहे. बुलढाणा आणि मेहकर शिंदे गटाला आणि उमेदवार अनुक्रमे संजय गायकवाड व संजय रायमूलकर हे जवळपास निश्चित. भाजपच्या वाट्याला चार मतदारसंघ येणार आहेत. यापैकी खामगावमधून आकाश फुंडकर, चिखलीमधून श्वेता महाले, जळगावमधून संजय कुटे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मलकापूरची जागा भाजपची हे निश्चित असून उमेदवारीचा निर्णय लवकरच होईल, असा रागरंग आहे. अजित पवार गटाच्या वाट्याला एकमेव सिंदखेड राजा मतदारसंघ जाईल, असे चित्र आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute in maha vikas aghadi over seat sharing for upcoming assembly election in buldhana print politics news zws