नाशिक : शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे ) कामगाराच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या राष्ट्रीय कामगार सेना आणि महाराष्ट्र राज्य कामगार सेना या दोनच अधिकृत संघटना असल्याचे राज्य कामगार सेनेचे अध्यक्ष जेरीभाई डेव्हिड यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील शिव कर्मचारी सेना संघटनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिंदे गटातील दुफळीचे प्रतिबिंब कामगार संघटनांवर उमटले आहे.

शिवसेना दुभंगण्यापूर्वी जसे गट-तट होते, तशीच स्थिती आज शिंदे गटात आहे. नाशिकची जबाबदारी सांभाळणाऱ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडून गटबाजीला खतपाणी घातले जात असल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे झाल्या होत्या. परंतु, ती थांबण्याऐवजी वाढत आहे. पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांची शिव कर्मचारी सेना अलीकडेच सक्रिय झाली होती. लगोलग महाराष्ट्र राज्य कामगार सेनेचे अध्यक्ष जेरीभाई डेव्हिड यांनी शिवसेना शहर कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिंदे गटाच्या राष्ट्रीय कामगार सेना आणि महाराष्ट्र राज्य कामगार सेना या दोनच अधिकृत संघटना असल्याचे ठणकावून सांगितले. यावेळी उपनेते, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी महानगरपालिका, महामंडळे आदी ठिकाणी शिवसेना कामगार सेनेची स्थापना करण्याचे जाहीर केले.

या घटनाक्रमातून शिंदे गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड झाले. पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिव कर्मचारी सेना ही कामगार संघटना कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी या संघटनेची नाशिकमधील दोन कारखान्यांमध्ये स्थापना करण्यात आली. यावेळी शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे उपस्थित होते.

डेव्हिड यांच्या स्पष्टोक्तीमुळे चौधरी यांची कामगार संघटना अधिकृत की अनधिकृत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. डेव्हिड यांच्या बैठकीस काही पदाधिकारी अनुपस्थित होते. यातून पक्षांतर्गत कलह अधोरेखीत झाला. एकसंघ शिवसेनेत सुनील बागूल यांची श्रमिक सेना ही कामगार संघटना होती. पक्षाने तेव्हा ती बंद करण्यास सांगितले होते. परंतु, बागूल यांनी ती कामगार संघटना कार्यरत ठेवली. शिंदे गटातही तीन कामगार संघटनांमुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.