भंडारा : विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर होताच महायुतीतील ठिणगीचे वणव्यात रुपांतर झाले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षांतील इच्छुकांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भंडारा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीकरिता आरक्षित आहे. या जागेवर भाजपनेही दावा केला होता. यामुळे शिवसेनेने उमेदवारी न दिल्यास आमदार भोंडेकर यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, शिंदेसनेने ही जागा आपल्या पदरात पाडून घेतली. भोंडेकर यांना येथून उमेदवारी देत त्यांची उपनेते आणि पूर्व विदर्भाच्या समन्वयपदी नियुक्ती करून नाराजी दूर केली. आता महायुतीकडून ते शिवसेनेचे अर्थात महायुतीचे उमेदवार असतील.

हेही वाचा – महामार्ग रद्द करण्याच्या अधिसूचनेनंतर महायुती – ‘मविआ’त राजकीय शह – काटशह

लोकसभा निवडणुकीत भोंडेकर यांच्याकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही. भंडारा विधानसभा मतदारसंघात कमी मते पडल्याने भाजप उमेदवाराचा पराभव झाला, असा आरोप भाजप पदाधिकारी सातत्याने करीत आले आहेत. अशातच, भोंडेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने या नाराजीची धार अधिक तीव्र झाली आहे. भाजपमधील आशीष गोंडाणे यांनी भोंडेकर यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नरेंद्र पहाडे हे देखील अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. यामुळे भोंडेकर यांच्यासमोर काँग्रेस उमेदवारासह दोन अपक्षांचे आव्हान असणार आहे.

तुमसरमध्येही बंडाचा झेंडा!

राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) तुमसर विधानसभा मतदारसंघातून चरण वाघमारे यांना महायुतीची उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे तुमसरमधील भाजप आणि शिवसेनेतील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. यामुळे तुमसरमध्येही बंडखोरीची चिन्हे आहेत. असे झाल्यास महायुतीच्या उमेदवाराचे समीकरण बिघडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात अजित पवार, शिंदे, ठाकरेंच्या पक्षांना भोपळा! एकही जागा न मिळाल्याने कार्यकर्ते अस्वस्थ

महाविकास आघाडीसमोरही आव्हाने

महाविकास आघाडीकडून भंडारा मतदारसंघाच्या उमेदवाराचे नाव जाहीर झाले नसले तरी ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याचे बोलले जाते. मात्र, काँग्रेसच्या संभाव्य उमेदवाराचे नाव चर्चेत येताच बौद्ध दलित समाजाच्या गटाने विरोधी भूमिका घेतली आहे. बौद्ध दलित समाजाच्या उमेदवाराला संधी न दिल्यास राजीनामे देऊन बंडखोरी करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या मतदारसंघात बौद्ध दलित मते निर्णायक ठरतात. यामुळे समाजाच्या नाराजीचा फटका काँग्रेस उमेदवाराला बसू शकतो. दुसरीकडे, तुमसर मतदारसंघ महाविकास आघाडीत शरद पवारांच्या वाट्याला गेल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवाराचे नाव समोर येताच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत तिसरी आघाडी निर्माण करण्याची तयारी सुरू केली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dissatisfaction in the mahayuti in bhandara aspirants prepare to fight independently against narendra bhondekar print politics news ssb