रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभेबरोबर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात झालेल्या मोठ्या पक्ष प्रवेशानंतर अनेक कार्यकर्ते पदाविना राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये धुसफुस वाढू लागली आहे. कोणतीही पदे मिळत नसल्याने अनेक कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अशा कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान पालकमंत्री उदय सामंत यांच्या समोर उभे राहीले आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून संपुर्ण राज्यात ‘ऑपरेशन टायगर ‘ राबविण्यात आल्यानंतर त्याचा प्रभाव रत्नागिरी जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर दिसून आला. जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुखांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र हे सर्व कार्यकर्ते आजही पदाविनाच शिंदे गटात कार्यरत आहेत. अशा अनेक कार्यकर्त्यांना पदे न मिळाल्याने जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफुस वाढू लागली आहे. शिंदे गटात आलेल्या कार्यकर्त्यांनी पदे न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शिंदे गटात कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने सर्वाना खुश करण्यासाठी जिल्हा कार्यकारणी मागील महिन्य बरखास्त केली. तसेच नवीन कार्यकारणी पुढील आठ दिवसात जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप ही या आश्वासनाची पुर्तता न झाल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही कार्यकर्ते पुन्हा घरवापसी करण्याच्या विचारात असल्याचे चर्चिले जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले अनेक कार्यकर्ते आजही पद मिळण्याकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र आपणाला कोणते पद मिळणार आणि कधी मिळणार ? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलेला आहे. मात्र येणारा काळच या कार्यकर्त्यांचे भवितव्य ठरविणार असल्याचे राजकीय वर्तुळातून सांगितले जात आहे. मात्र आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करुन त्यांना योग्य पदे देण्याचे आव्हान पालकमंत्री उदय सामंत यांच्या समोर उभे राहीले आहे. पालकमंत्री उदय सामंत अशा कार्यकर्त्यांची नाराजी दूर करुन जुने आणि नवीन कार्यकर्त्यांना खुश ठेवण्याबरोबर कोणा – कोणाला पदे देणार याकडे आता जिल्हा वासियांचे लक्ष लागून राहीले आहे.

शिवसेना ठाकरे गट सोडून काही कार्यकर्त्यांनी चुक केली आहे. शिंदे गटात त्यांना पदे मिळणे अवघड आहे. ज्याना पदे भोगायची सवय आहे, ते पुन्हा शिवसेना ठाकरे पक्षात लवकरच येतील. -प्रसाद सावंत, तालुका युवा अधिकारी, शिवसेना ठाकरे गट, रत्नागिरी