अलिबाग- उमेदवारी न मिळालेल्या भाजपमधील असंतुष्ट शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. राजन तेली पाठोपाठ आता बाळ मानेही ठाकरे गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे कोकणात भाजपला निवडणुकीआधीच धक्के बसले आहेत. असंतुष्टांना थोपवण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर असणार आहे.
कोकणात महायुतीच्या जागा वाटपात शिवसेना शिंदे गटाला मोठा वाटा मिळाला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. पाच वर्षे उमेदवारी मिळणार या आशेवर असलेल्या, पण उमेदवारी मिळणार नसलेल्या असंतुष्ट नेत्यांनी बंडाचा पावित्रा घेतला आहे. सिंधुदूर्ग, रत्नागिरीपाठोपाठ रायगड जिल्ह्यातही भाजपमध्ये बंडखोरी होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमधून भाजपकडून राजन तेली यांना उमेदवारी हवी होती, मात्र जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळाला, दिपक केसरकर यांना पुन्हा महायुतीचे उमेदवार म्हणून संधी मिळणार असल्याचे निश्चित झाले. त्यामुळे नाराज झालेल्या राजन तेली यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्गात भाजपला मोठा धक्का बसला.
रत्नागिरी मतदारसंघातून भाजपचे बाळ माने उमेदवारी न मिळाल्याने, शिवसेना ठाकरे गटात दाखल झाले. पक्ष सोडू नका म्हणून रविंद्र चव्हाण आणि चित्रा वाघ यांनी त्यांची मनधरणी केली होती, मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवली. १९९९ मध्ये बाळ माने रत्नागिरीतून विधानसभेवर गेले होते. मात्र २००४, २००९ आणि २०१४ मध्ये त्यांचा उदय सामंत यांनी पराभव केला होता. शिवसेना पक्ष फुटीमुळे उद्धव ठाकरे गटात निर्माण झालेली संधी त्यांनी हेरली आणि भाजप सोडण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा – रामटेक : काँग्रेसने युद्धात जिंकले, अन तहात गमावले
रायगड जिल्ह्यातील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असलेल्या दिलीप भोईर यांना अलिबाग विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा होती. शेकापमधून भाजप प्रवेश करताना त्यांनी ही इच्छा बोलूनही दाखवली होती. निवडणूक लढवण्याची संधी मिळेल या आशेवर त्यांनी मतदारसंघात पक्ष संघटनेची बांधणी केली होती. पक्षाच्या वॉररूमचा वापर करून त्यांनी जनमानसात आपली ओळख निर्माण केली होती. विविध सामाजिक उपक्रम राबवले होते. मात्र महायुतीतून ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटणार असल्याचे लक्षात येताच त्यांनी बंडाचा पावित्रा घेतला आहे. उमेदवारी मिळत नसल्याने उपलब्ध पर्यायांचा वापर करून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तेसुद्धा उध्दव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र महाविकास आघाडीत शेकापला सामावून घेण्यात येणार असल्याने, भोईर यांच्याबाबतचा निर्णय तुर्तास घेणे शिवसेना ठाकरे गटाने टाळला आहे.