पुढील महिन्यात पाच राज्यांसाठी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यातही राजस्थानची निवडणूक काँग्रेसने उमेदवारांची यादी उशिरा जाहीर केल्यामुळे अधिक चर्चेत आली आहे. १८ ऑक्टोबरला काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार होते; परंतु, बैठका, चर्चा, अंतर्गत वाद यांमुळे यादी जाहीर करण्यास उशीर झाला. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यावर पक्षामध्ये नाराजीनाट्याला सुरुवात झाली. काहींनी निषेध केला; तर काहींनी पक्षांतर केले. राजस्थानमध्ये काँग्रेसअंतर्गत सुरू असणाऱ्या नाराजीची कारणे, कोणी पक्षांतर केले, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
हेही वाचा : छत्तीसगडमध्ये विद्यमानांना धक्का; भाजपाने जाहीर केले ४ नवीन उमेदवार
राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. आतापर्यंत काँग्रेसने २०० पैकी ७६ मतदारसंघांसाठी; तर भाजपाने १२४ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. काही नेते तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झाले असून, ते पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसने जाहीर केलेल्या ७६ जागांमध्ये विद्यमान नेत्यांना तिकीट मिळाले आहे; तर तिकिटावरून वाद झालेल्या जागाही खूप कमी आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत, विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी व माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
हेही वाचा : सरसंघचालकांच्या भाषणात वोकवादाचा उल्लेख, काय आहे या संकल्पनेचा इतिहास
नाराजी आणि पक्षांतर
या आठवड्याच्या सुरुवातीलाच सर्व ब्राह्मण महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले काँग्रेस नेते पंडित सुरेश मिश्रा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मिश्रा यांनी विधानसभेचे तिकीट मिळावे, यासाठी दावा केला होता. परंतु, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जयपूरमधील सांगानेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने दुसरे ब्राह्मण नेते पुष्पेंद्र भारद्वाज यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
२००८ मधील विधानसभा निवडणूक मिश्रा यांनी सांगानेरमधून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. पायलट यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या मिश्रा यांनी गेल्या वर्षी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून २५ सप्टेंबर २०२२ रोजी पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार घातलेल्या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या आमदारांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार घातला, तसेच पायलट यांना मुख्यमंत्रिपद मिळू नये यासाठी पक्षनेतृत्वाकडे राजीनामे दिले. या घटनांबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
सोमवारी (२३ ऑक्टोबर) त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. ”सनातन धर्माला नष्ट करण्याचे काम सुरू आहे. आयुष्याची १५ वर्षे कोणत्याही सन्मानाशिवाय घालवलेल्या पक्षात मला आता राहायचे नाही,” अस मिश्रा यांनी सोमवारी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर पत्रकारांना सांगितले.
जयपूरमधील मालवीय नगर विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारल्याबद्दल नाराज होऊन काँग्रेसमधील ब्राह्मण नेते महेश शर्मा यांनी समाजकल्याणासाठी राजस्थान राज्य विप्र कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेसने या जागेकरिता ज्येष्ठ नेत्या अर्चना शर्मा यांना रिंगणात उतरवले आहे. अर्चना शर्मा यांनी २०१३ व २०१८ मध्ये येथून विधानसभा निवडणूक लढवली होती.
दौसा जिल्ह्यातील महवा मतदारसंघाकरिता काँग्रेसने विद्यमान अपक्ष आमदार ओम प्रकाश हुडला यांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. पक्षनेतृत्वाने स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. हुडला हे महवा मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. एकदा भाजपाने तिकीट दिले होते; तर एक वेळ ते अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत.
काँग्रेसमधील सूत्रांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, काँग्रेसने कमी जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. कारण- २०१८ च्या निवडणुकीनंतर अपक्ष आमदार आणि बसपाच्या आमदारांनी काँग्रेसला समर्थन दिले होते. पण, अशा आमदारांना तिकीट देण्यास काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध आहे. तसेच अनेक भागांतील स्थानिक कार्यकर्त्यांचाही अन्य पक्षातील नेत्यांना उमेदवारी देण्यास विरोध आहे. परंतु, गहलोत यांनी सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांविषयी आभारी असल्याचे म्हटल्यामुळे त्या आमदारांना काँग्रेसचे तिकीट मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.