नागपूर : प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पहिला नागपूर दौरा १६ एप्रिलला नागपूरला होत असून यानिमित्ताने जिल्हा आणि शहर काँग्रेस समितीने तयारी सुरू केली आहे. याे दौऱ्यात सपकाळ यांना पक्षातील गटबाजी संपवून नेत्यांमध्ये सद् भावना निर्माण करण्याचे आव्हान असणार आहे. नागपुरात नुकत्याच झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगलीच्या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी नागपुरात १६ एप्रिलला सद्भभावना यात्रा काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सामाजिक सद्भभावनेसोबत सपकाळ यांना गटबाजीने पोखरलेल्या पक्षातही सद्भभावना निर्माण करावी लागणार आहे, यात्रेच्या तयारीसाठी जिल्हा व शहर काँग्रेसच्या बैठकांचे सत्र सुरू आहेत. यात कार्यकर्ते व नेत्यांनी केलेली भाषणे पक्षात आलबेल नसल्याची संकेत देणारी आहे. सपकाळ यांच्या दौ-यापूर्वीच भाजपने उमरेड तालुक्यात काँग्रेसला खिंडार पाडण्याचे प्रयत्न केले. ग्रामीणमध्ये केदार समर्थक नेते नाराज आहे, शहरात आमदार विकास ठाकरे यांना त्यांचा विरोधी गट सहकार्य करण्यास तयार नाही, अशी स्थिती आहे.

ग्रामीण काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष नाही, प्रभारी अध्यक्षांना मर्यादा आहेत, जिल्ह्यातील केदार गट जिल्हा काँग्रेस समितीपासून अंतर राखून आहे. हीच स्थिती शहर काँग्रेसची आहे. विद्यमान अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी यापूर्वीच पदसोडण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यांनी राजीनामाही दिला होता. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना काम सुरू ठेवा, अशी विनंती केली होती. त्यांच्या जागेवर नवीन अध्यक्ष् सपकाळ देणार का ? याची चर्चा सध्या पक्षात सुरू आहे.

विधानसभा निवडणुकी दरम्यान पक्षातील गटबाजी उघड झाली होती. पक्षाचे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली म्हणून त्यांना निलंबित केले होते. त्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात सहभागी करून घ्या, असा मतप्रवाह एका गटाचा आहे. त्यावर सपकाळ काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणारे आहे. त्याच प्रमाणे मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारे पक्षाचे युवा नेते बंटी शेळके यांनीही निवडणुकीनंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्षांवर गंभीर आरोप केले होते. त्यावर पक्ष काय भूमिका घेणार हा सुद्धा प्रश्न आहे.

एकूणच सपकाळांचा हा पहिला दौरा असला तरी त्यांच्यापुढे येथे अनेक प्रश्न आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला सुद्धा राहणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याला महत्व आहे. काँग्रेस नेते व राज्यसभा सदस्य मुकुल वासनिक यांचे निकटवर्तीय म्हणून सपकाळ ओळखले जातात. ग्रामीण काँग्रेसमध्ये वासनिक यांच्या कार्यशैलीमुळे नाराज असलेला एक मोठा गट आहे, त्यांना कसे सोबत घ्यायचे हा प्रश्न सपकाळ यांना पडणार आहे.