कोल्हापूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सीमाभागात एकीकरण समितीसह राष्ट्रीय पक्षांकडून उमेदवारांची जवळपास निश्चिती होत असताना एकीकरण समितीने भाजप व काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांच्या महाराष्ट्रातील प्रतिनिधी विरोधात रोष व्यक्त केला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये भाजपच्या नेते मंडळींनी बेळगावात ठाण मांडून प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे प्रतिनिधीसुद्धा बेळगाव गावात दाखल होणार असल्याचे वृत्त आहे. याची धास्ती सीमावासियांना जाणवू लागली असून त्यांनी महाराष्ट्रातील भाजप व काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना पत्र पाठवून महाराष्ट्रातील प्रतिनिधींना माघारी बोलवून घ्यावे अशी मागणी करणारे पत्र पाठवले आहे. मराठी भाषिक मतदारांच्या मतांमध्ये फूट होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत रंग भरू लागला आहे. सत्ताधारी भाजप, प्रमुख विरोधक काँग्रेस तसेच या दोघांशी सत्तासंग केलेला निधर्मी जनता दल (निजद) या प्रमुख पक्षांनी उमेदवारांवर जवळपास शिक्कामोर्तब केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीनेही याबाबतीत आघाडी घेतलेली आहे. एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार अर्ज भरून प्रचाराच्या तयारीत असताना त्यांना भाजप व काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रतिनिधींकडून होणारा प्रचार खटकला आहे. या विरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने मंगळवारी पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा – सचिन पायलट अशोक गेहलोत सरकरविरोधात पुन्हा आक्रमक, म्हणाले “उपोषणाला आठवडा झाला, पण…”
दुट्टपी भूमिकेवर संताप
बेळगावचा सीमाप्रश्न उपस्थित झाला की महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्ष व त्यांची नेतेमंडळी सीमावासियांच्या लढ्याला पाठबळ देण्याची भूमिका जाहीर करतात. मात्र कर्नाटकात लोकसभा – विधानसभा निवडणूक सुरू झाली की एकीकरण समितीच्या उमेदवारांना अडचणीत आणणारी भूमिका घेतली जाते. भाजप व काँग्रेस या महाराष्ट्रातील पक्षांचे प्रमुख नेते तसेच स्टार प्रचारक कर्नाटकात प्रचारासाठी मोठ्या संख्येने उतरत असतात. सीमाभाग वगळता अन्यत्र या पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराला जाण्यास सीमावासियांची हरकत नाही. यावेळी एकीकरण समितीचे उमेदवार बेळगाव उत्तर, दक्षिण, ग्रामीण खानापूर, यमकनमर्डी व निपाणी या ५ सीमाभागांतील मतदारसंघांमध्ये रिंगणात आहेत. यावेळी समितीला वातावरण अनुकूल असल्याचा प्राथमिक निष्कर्ष समितीचे नेते मांडत आहेत. अशावेळी महाराष्ट्रातील भाजप व काँग्रेसच्या नेत्यांनी सुरू केलेला प्रचार अडचणीचा ठरणार असल्याने त्याला सीमावासियांनी विरोध केला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सीमाभागामध्ये भाजपचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ व अन्य नेते मंडळींनी प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या प्रचाराचा परिणाम समितीच्या अधिकृत उमेदवारांवर होवू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. अशाप्रकारे एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करून सीमावासियांना दिलेल्या आश्वासनांचा विश्वासघात करण्याचा हा प्रकार असल्याची चीड व्यक्त केली आहे. पाठोपाठ काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधीसुद्धा बेळगावात दाखल होणाचे संकेत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील भाजप व काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी त्यांच्या महाराष्ट्रातून आलेल्या प्रतिनिधींना माघारी बोलावून घ्यावे, तसेच एकीकरण समितीच्या कोणत्याही उमेदवाराच्या विरोधात प्रचारात सहभागी होऊ नये अशा सूचना देण्यात याव्यात, या मागणीचे पत्र पाठवण्यात आले आहे. निवेदनाची गांभीर्याने दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावचे अध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी दिला आहे.
हेही वाचा – ‘वज्रमूठ’ सभा यशस्वी पण, काँग्रेसमधील नाराजी नाट्याचीच चर्चा
भाजपात कुरघोडीचे राजकारण
बेळगाव जिल्ह्यातील भाजपअंतर्गत राजकारण, कुरघोड्या हा चिंतेचा विषय बनला आहे. बेळगाव ग्रामीणमध्ये नागेश मंडोळकर यांना उमेदवारी दिली आहे. बलाढ्य नेते रमेश जारकीहोळी यांच्या दबावामुळे ही उमेदवारी दिली गेल्याची उघड चर्चा पक्षात आहे. यामुळे निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याच्या भावना भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करताना अश्रूंचा बांध कोसळला. अशा परिस्थितीमध्ये भाजपला निवडणुकीला सामोरे जाऊन यश मिळवणे आव्हानास्पद बनले आहे.