तामिळनाडूमधील सत्ताधारी द्रमुक (DMK) पक्षाने शनिवारी चेन्नई येथे ‘महिला अधिकार परिषदे’चे आयोजन केले होते. या परिषदेसाठी देशभरातील प्रमुख महिला नेत्यांसह काँग्रेसच्या माजी अध्यक्षा, खासदार सोनिया गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हे एकत्र आलेले पाहायला मिळाले. महिला सक्षमीकरण आणि देशातील सत्ताधारी फुटीरतावादी शक्तींविरुद्ध एकत्र येण्याचा निर्धार या परिषदेच्या माध्यमातून करण्यात आला. सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला द्रमुकचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री के. करुणानिधी यांचे स्मरण करून ते लिंग समानतेचे पुरस्कर्ते असल्याचे म्हटले. तसेच स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक सरकार राज्यातील महिलांना त्यांचे अधिकार देण्याचे पूर्ण प्रयत्न करत असल्याचेही त्या म्हणाल्या. स्टॅलिन यांनी महिलांना सरकारमध्ये ४० टक्के प्रतिनिधित्व दिले आहे, याबद्दलही त्यांनी अभिनंदन व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भूतकाळात ज्या ज्या नेत्यांनी महिला अधिकारांसाठी प्रयत्न केले, त्या नेत्यांच्या बलिदानाची आठवण सोनिया गांधी यांनी यावेळी करून दिली. “महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या अहिंसक स्वातंत्र्य लढ्यात स्त्री-पुरुष समानतेवर भर देण्यात आला होता.” या सोबतच सोनिया गांधी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचेही एक वाक्य उद्धृत केले. “एका पुरुषाला शिक्षण दिले, तर फक्त एक व्यक्ती शिक्षित होते, जर तुम्ही एका महिलेला शिक्षण दिले तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते”, असे नेहरू म्हणाले असल्याची आठवण त्यांनी करून दिली.

महिला परिषदेच्या माध्यमातून भाजपावर टीका

मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी आपल्या भाषणात भाजपावर टीका केली. महिलांना संसदेत आणि विधिमंडळात ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी भाजपाने विधेयक संमत केले, पण त्यांची ही भूमिका फसवी आणि दुटप्पी आहे. स्टॅलिन यांनी महिला विधेयकात ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका पक्षाची सत्ता स्थापन करण्याच्या विचारात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात एक पक्षीय राजवट सुरू करायची आहे, त्यामुळे इतर राजकीय पक्षांनी एकत्र येऊन भाजपाला पराभूत करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले.

ज्याप्रकारे तामिळनाडूमध्ये आम्ही आघाडी केली आहे, त्याप्रमाणे प्रत्येक राज्यात आघाडी स्थापन झाली पाहिजे. ही आघाडी केवळ निवडणुकीपुरती मर्यादित न ठेवता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, राज्यांची स्वायत्तता, संघराज्य आणि सर्वसमावेशक राजकीय सहभाग या विचारांना मूर्त स्वरुप देण्याचे कामही या माध्यमातून झाले पाहिजे. इंडिया आघाडीची स्थापना या विचारांवरच झाली आहे. इंडिया आघाडीच्या विजयाच्या माध्यमातून आम्ही केवळ महिलांचेच नाही तर सर्व नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणार आहोत, अशी भूमिका स्टॅलिन यांनी मांडली.

या परिषदेला देशभरातील विविध पक्षांच्या महिला नेत्या उपस्थित होत्या. आजच्या सामाजिक-राजकीय पार्श्वभूमीवर महिलांना भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एकता, सशक्तीकरण करण्याची आवश्यकता असल्याच्या विचारावर परिषदेत एकमत करण्यात आले.

या परिषदेसाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी, पीडीपी पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, बिहारमधील जेडीयू पक्षाच्या आमदार लेशी सिंह, आपच्या नेत्या आणि दिल्ली विधानसभेच्या अध्यक्षा राखी बिर्ला, समाजवादी पक्षाच्या नेत्या डिम्पल यादव, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सुश्मिता देव, सीपीआ (एम) च्या नेत्या सुभाषिनी अली आणि सीपीआयच्या नेत्या ॲनी राजा उपस्थित होत्या. या परिषदेच्या मुख्य आयोजक द्रमुकच्या खासदार कनिमोळी होत्या.

एम. करुणानिधी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त प्रियंका गांधी यांनी माजी मुख्यमंत्री करुणानिधी, सामाजिक परिवर्तनाचे नेते पेरियार आणि द्रमुक पक्षाचे संस्थापक अन्नादुराई यांना अभिवादन व्यक्त केले. महिला आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी राजीव गांधी यांच्या हत्येनंतरच्या आठवणी आणि तामिळनाडूमधील महिलांकडून मिळालेला दिलासा याबाबतही प्रियंका गांधी यांनी समाधान व्यक्त केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dmk womens empowerment conference for unity against bjp kvg