लखनौ येथे राहणारे रजनीश सिंग हे व्यवसायाने डेंटीस्ट असून त्यांनी दंत शस्त्रक्रियेत पदवी प्राप्त केली आहे. असं असुनसुद्धा ते नियमित दवाखान्यात जाऊन रुग्णांना तपासत नाहीत. कारण त्यांचा बराचसा वेळ हा सामाजिक आणि राजकीय कामे करण्यातच जातो. विशेषत: ताजमहाल संदर्भात नियमित याचिका दाखल करण्यात त्यांचा बराचसा वेळ जातो. नुकतेच ताजमहल संदर्भात दाखल केलेली याचिका फेटाळून लावत अलाहाबाद उच्च न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. अयोध्या भाजपा मीडिया विभागाचे प्रभारी रजनीश सिंग यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी ताजमहालच्या इतिहासाची तथ्यशोधन चौकशी करावी आणि ताजमहल मधील २२ खोल्या उघडण्यात याव्या अशी मागणी केली होती. यावर न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यास ते असमर्थ ठरल्यामुळे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना कडक शब्दांत सुनावले. सिंग यांनी ताजमहालला ऐतिहासिक वास्तुचा दिलेला दर्जा काढुन घेण्याचीसुद्धा मागणी केली होती. आरएसएसचे स्वयंसेवक असणा-या रजनीश सिंग यांची अयोध्या भाजपाच्या मीडिया प्रभारी पदी नेमणूक करण्यात आली होती.
दरम्यानच्या काळात ताजमहाल ही वास्तू सिंग यांच्या अजेंंड्यावर आली. ताजमहालमध्ये असलेल्या खोल्यांची माहिती मिळावी यासाठी त्यांनी डझनभर माहिती अधिकारांतर्गत (आरटीआय) अर्ज दाखल केले आहेत. २०१९ ते २०२१ या काळात त्यांनी या विषयाची माहिती मिळवण्याचा खूप प्रयत्न केला. सिंग यांनी केलेल्या आरटीआय अर्जाला मिळालेल्या उत्तराच्या आधारेच त्यांनी ताजमहालमधील २२ खोल्या उघडण्याची याचिका केली होती. याबाबत त्यांनी भाजपाच्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या पण हाती काहीच लागले नाही. त्यामुळे याचिका दाखल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हा निर्णय त्यांचा वैयक्तिक असून त्याच्याशी भाजपाच्या कुठल्याही नेत्याचा संबंध नसल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाने खचून न जाता ते आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. दाखल केलेल्या याचिकेवर ते सांगतात की याचिका करण्यामागे माझा हेतू खूप शुद्ध आहे. ताजमहाल बाबत वेगवेगळ्या गटांकडून वेगवेगळे दावे केले जातात. सततच्या या दाव्यांमुळे या वास्तुची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे याबबतीतील सत्य बाहेर यावे या एकमेव उद्देशाने ही याचिका केल्याचे ते सांगतात.
स्थानिक भाजपा नेत्यांनीसुद्धा त्याच्या या कामाशी पक्षाचा संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तो आयोध्याचा ग्रामस्थ असुन त्या भागतील मिडीयाच्या लोकांशी त्चांचे चांगले संबंध आहेत याचा पक्षाला उपयोग व्हावा या हेतूनं त्याची अयोध्या मिडीया प्रभारी पदावर नियुक्ती केल्याचं स्थानिक भाजपा नेते सांगतात.