चंद्रपूर : वैद्यकीय क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या डॉक्टरांना आता आमदारकीची स्वप्ने पडायला लागली आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील तब्बल १० डॉक्टरांनी रुग्णसेवा सोडून थेट विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून डॉ. दिलीप कांबळे यांनी उमेदवारी मागितली आहे. त्यांचे चंद्रपुरात ‘सोनोग्राफी सेंटर’ आहे. दिल्ली व राज्य पातळीवरील काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असलेले डॉ. कांबळे यांनी काँग्रेस पक्षाकडून महाविकास आघाडीची उमेदवारी मिळावी, यासाठी सर्वच आघाड्यांवर प्रयत्न चालविले आहेत.
हेही वाचा – सांगलीतील संघर्ष मुद्द्यांवरून गुद्द्यांवर !
गोंडवाना विद्यापीठाने डी.लिट. पदवी प्रदान केल्यानंतर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावासमोरदेखील ‘डॉक्टर’ लागले आहे. या डॉक्टरांविरोधात बल्लारपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडून तीन डॉक्टर इच्छुक आहेत. यामध्ये डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे नाव आघाडीवर आहे. त्या काँग्रेसकडून उमेदवारी मागत असल्या तरी भूमिपूत्र ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांचे काम सुरूच आहे. डॉ. विश्वास झाडे यांना दुसऱ्यांदा या मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी हवी आहे. माळी समाजाचे डॉ. संजय झाडे हे देखील काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्नरत आहेत.
वरोरा विधानसभा मतदारसंघातून नेत्रतज्ज्ञ डॉ. चेतन खुटेमाटे यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. त्यांनी तीन महिन्यांपूर्वीपासूनच या क्षेत्रात नेत्र तपासणी शिबिर आणि शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्य आणि याच क्षेत्रातून एकदा विधानसभा निवडणूक लढलेल्या डॉ. आसावरी देवतळे, चंद्रपूर जिल्हा बँकेचे संचालक डॉ. विजय देवतळे आणि डॉ. खापणे हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
हेही वाचा – पुण्यात मोदींचे मंदिर उभारणाऱ्या कार्यकर्त्याचा भाजपला ‘रामराम’
चिमूर मतदारसंघातून डॉ. सतिश वारजूकर यांना सलग तिसऱ्यांदा काँग्रेसची उमेदवारी हवी आहे. भाजपचे माजी महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे हे देखील याच क्षेत्रातून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.
वकीलही सक्रिय
डॉक्टरांपाठोपाठ वकील मंडळीदेखील निवडणुकीच्या रिंगणात सक्रिय झाली आहे. शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप राजुरा विधानसभा मतदारसंघातून लढणार, हे निश्चित मानले जात आहे. त्याच पाठोपाठ भाजपचे माजी आमदार ॲड. संजय धोटे, चंद्रपुरातून ॲड. राहुल घोटेकर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. याव्यतिरिक्त सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुधाकर अंभोरे यांनाही निवडणूक लढायची आहे.