प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा व विधानसभा प्रमुखांची नावे नुकतीच जाहीर केली. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुखपदी प्रमोद कडू यांची निवड करण्यात आली. याचबरोबर सहाही विधानसभा प्रमुखांचीही नावे जाहीर करण्यात आली. या नियुक्त्यांमध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार गटाचे वर्चस्व, तर माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर समर्थकांना डावलल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यात भाजपचे दोन गट सक्रिय आहेत. एक गट विद्यमान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा तर दुसरा भाजप नेते तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने आगामी सहा महिन्यांत चंद्रपूर लोकसभेसाठी पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. अशातच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुखपदी प्रमोद कडू यांची नियुक्ती केली आहे. कडू मुनगंटीवार गटाचे आहेत. याशिवाय, राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुखपदी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूर विधानसभा प्रमुखपदी चंदनसिंह चंदेल तर चंद्रपूर विधानसभा प्रमुखपदी आ. रामदास आंबटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरोरा विधानसभा क्षेत्राच्या प्रमुखपदी रमेश राजुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत राजुरकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख म्हणून माजी आमदार अतुल देशकर जबाबदारी पार पाडतील, तर चिमूर विधानसभा प्रमुखपदी गणेश तळवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा – अमित शहांच्या भाषणात उद्धव ठाकरेंचा ११ वेळा उल्लेख

उल्लेखनीय आहे की, २०१९ च्या निवडणुकीत राजुरा, चंद्रपूर, वरोरा व ब्रम्हपुरी या चार विधानसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला होता. या चारही मतदारसंघात जे प्रमुख निवडण्यात आले आहे, ते चारही पालकमंत्री मुनगंटीवार गटाचे आहेत. चंद्रपूर लोकसभा आणि सहाही विधानसभा प्रमुखांच्या निवडीत मुनगंटीवार गटाचेच वर्चस्व दिसून येत आहे. यात अहीर समर्थकांना कुठेही जबाबदारी देण्यात आली नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अहीर ४४ हजार मतांनी पराभूत झाले होते. काँग्रेसचे दिवं. खासदार धानोरकर यांनी त्यांचा पराभव केला होता. या पराभवानंतर भाजपने सावध पावित्रा घेतला आहे. मात्र, अहीर समर्थकांना या नियुक्त्यांमध्ये डावलण्यात आल्यामुळे नाराजीचे सूर उमटू लागले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dominance of the sudhir mungantiwar group and hansraj ahir supporters neglected print politics news ssb