२०२४ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसला वगळून भाजपाविरोधी राष्ट्रव्यापी आघाडी बनविण्यासाठी समाजवादी पक्ष प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेची दोन दिवसांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. याआधी २०१२ साली समाजवादी पक्षाने कोलकाता येथे अशीच बैठक घेतली होती. या वेळी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे पश्चिम बंगालमधील भाजपाविरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतील, अशी माहिती समाजवादी पक्षाच्या नेत्याने दिली. १७ मार्च रोजी दुपारी पाच वाजता अखिलेश यादव आणि सपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि बंगालमधील सपाचे नेते किरणमॉय नंदा हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. अखिलेश यादव आणि बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश राज्यांत २०२१ आणि २०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांना मदत केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या बैठकीत देशातील आर्थिक आणि राजकीय परिस्थिती आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होईल. तसेच पक्षातील तरुण नेते पक्षसंघटना मजबूत करण्याबाबत संवाद साधतील, अशी माहिती किरणमॉय नंदा यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली. अखिलेश यादव हे विविध राज्यांमधील भाजपाविरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे काम करत आहेत. आम्हाला काँग्रेसप्रणीत आघाडीत सामील व्हायचे नाही. या सर्व विषयांबाबत कोलकातामधील बैठकीत चर्चा होईल आणि सर्वांनुमते त्यावर निर्णयदेखील होईल.

काही दिवसांपूर्वीच अखिलेश यांनी काँग्रेसवर टीका केली होती. तसेच अमेठी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणार असल्याचेही अखिलेश यादव यांनी जाहीर केले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी मतदारसंघात राहुल गांधी यांचा स्मृती इराणी यांनी पराभव केला होता. मागच्या शनिवारी अहमदाबाद येथे पत्रकारांशी बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, भाजपाने काँग्रेसच्या पावलावर पाऊल टाकून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू केला आहे. त्यामुळे एक दिवस भाजपाची गत काँग्रेससारखीच होईल.

मागच्या काही काळापासून अखिलेश यादव हे विविध राज्यांत जाऊन भाजपाविरोधकांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. यापुढील काळात भाजपाच्या विरोधात आघाडी झाली तर त्यात समाजवादी पक्ष केंद्रस्थानी असेल असा प्रयत्न यादव यांच्याकडून केला जात आहे. दरम्यान टीएमसी, आम आदमी पार्टी आणि भारत राष्ट्र समितीसारख्या पक्षांनाही काँग्रेसप्रणीत आघाडीमध्ये सामील व्हायचे नाही. डीएमकेसारख्या पक्षाला काँग्रेस राष्ट्रीय स्तरावर आघाडीसाठी योग्य पक्ष वाटतो.

१ मार्च रोजी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त अखिलेश यादव यांनी तामिळनाडूमधील समारंभाला हजेरी लावली होती. एमके स्टॅलिन हे राष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय होतील, असे भाकीत यादव यांनी वर्तविले होते. जानेवारी महिन्यात तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कार्यक्रमालाही त्यांनी भेट दिली होती. या कार्यक्रमात यादव यांनी त्यांचा राष्ट्रीय स्तरावर जाण्याचा विचार बोलून दाखविला होता. यासोबतच आम आदमी पक्षाचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन, सीपीआयचे सरचिटणीस डी राजा आणि बीआरएसच्या नेत्यांच्याही अखिलेश यादव यांनी भेटीगाठी घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont want to join congress programmes sp throws light on its position on oppn unity kvg