वसई : महाविकास आघाडीने पालघर जिल्ह्यातील दोन मतदारसंघांत उमेदवारी घोषीत केल्यानंतर मविआची बहुजन विकास आघाडीबरोबरच्या संभाव्य युतीची शक्यता मावळली आहे. राजीव पाटील यांच्यामार्फत पक्ष फोडण्याच्या कृतीमुळे बविआ भाजपापासून दुरावला होता. त्यामुळे बविआने महाविकास आघाडीबरोबर जाण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र आता महाविकास आघाडीचेही मार्ग बंद पडल्याने बहुजन विकास आघाडी या निवडणुकीत एकाकी पडला आहे.

बहुजन विकास आघाडीचे (बविआ) पालघर जिल्ह्यातील वसई, नालासोपारा आणि बोईसर या तीन मतदारसंघांत आमदार आहेत. सत्तेसोबत राहण्याचे बविआचे पूर्वीपासून धोरण राहिले आहे. त्यामुळे राज्यातील सत्तांतरानंतर बविआचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ सोडून भाजपाच्या महायुतीला साथ दिली होती. राज्यसभा, विधानपरिषद तसेच कोकण आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच बविआने भाजपाला साथ दिली होती. राज्यातील सत्तासंघर्षात देखील बविआ शिंदे-फडणावीस या महायुतीच्या बाजूने होती. असे सर्व काही आलबेल असताना भाजपने पक्षातील नाराज राजीव पाटील यांना चुचकारून आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला. राजीव पाटील हे हितेंद्र ठाकूर यांचे आत्येबंधू आणि पक्षाचे दुसर्‍या क्रमांकाचे नेते आहेत. ते भाजप मध्ये जाण्याच्या शक्यतेमुळे बविआमध्ये मोठी फूट पडणार होती. राजीव पाटील यांच्या मार्फत भाजपने ठाकूर यांचे घर आणि पक्ष फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. बहुजन विकास आघाडीसाठी हा फार मोठा विश्वासघात आणि होता. एवढी साथ देऊनही भाजपाने पक्ष फोडण्याचा प्रयत्न केल्याने बविआ कमालिची संतप्त झाली होती. मात्र कौटुंबिक दबावामुळे राजीव पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय रद्द केल्याने भाजपचे वसईतील ‘ऑपरेशन लोटस’ अयशस्वी झाले. पंरतु भाजपाने केलेल्या या विश्वासघातामुळे बविआ कमालीची दुखावली होती.

भाजपाला धडा शिकविण्यासाठी बविआने महाविकास आघाडीबरोबर जावे असा मतप्रवाह पक्षात होता. त्यानुसार बविआने महाविकास आघाडीबरोब सुत जुळविण्याचा प्रयत्न सुरू केला होता. तशा बैठकाही झाल्या होत्या. पालघर जिल्हयात ६ मतदारसंघ आहेत. त्यापैकी ३ मतदारसंघ बविआच्या ताब्यात आहे. उर्वरित ३ मतदारसंघात बविआची ताकद वाढत आहे. विक्रमगड, डहाणू मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयात बविआची मदत निर्णयाक ठरली होती. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील ३ मतदारसंघात बविआची मदत घ्यायची आणि महाविकास आघाडीने बोईसर, नालासोपारा आणि वसईत बविआला मदत करायची असे गणित जुळविण्याचा प्रयत्न होता. महाविकास आघाडीकडे नालासोपार्‍यात उमेदवारच नव्हता तर बोईसर मध्येही तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू होता. फक्त वसईच्या जागेची अडचण होती. कॉंग्रेसचे विजय पाटील वसईतून दावेदार होते. राज्यात सत्तास्थापनेसाठी बविआचे ३ आमदार उपयोगी पडू शकत असल्याने महाविकास आघाडीचे घटक पक्ष बविआला सोबत घेण्यासाठी अनुकूल होते. मात्र आता महाविकास आघाडीने बोईसरमध्ये विश्वास वळवी (ठाकरे गट) आणि वसईत विजय पाटील (कॉंग्रेस) यांची उमेदवारी जाहीर केली केल्याने बविआ-महाविकास आघाडी एकत्र येण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाले आहे. एकीकडे महायुतीने धोका दिला तर दुसरीकडे महाविकास आघाडीने सोबत घेण्यास नकार दिल्याने वसई विरार मध्ये मागील ३ दशकांहून अधिक काळ दबदबा असणारी बविआ एकाकी पडली आहे.

हे ही वाचा… अकोटमध्ये काँग्रेसचा गणगणे परिवारावर विश्वास, ॲड.महेश यांना दुसऱ्यांदा, तर कुटुंबात सातव्यांदा तिकीट; गठ्ठा मतदार लक्षात घेता माळी समाजाला प्रतिनिधित्व

बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र आम्ही कधीच कुणासोबत नव्हतो असा दावा केला आहे. आम्ही भाजपाला नव्हे तर विकास कामांसाठी सत्तेताल पाठिंबा दिला होता. आजवर आम्ही एकटेच लढलो आणि जिंकून आलो. त्यामुळे कुणी सोबत आले किंवा नाही आले तरी काही फरक पडत नाही, असे बविआच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. आम्ही सर्व निवडणुकी एकट्याच्या जोरावर लढून विरोधकांना चारी मुंड्या चित करत असतो. त्यामुळे आम्ही एकाकी नाही तर ताकदवान आहोत असेही या नेत्याने सांगितले.