चंद्रशेखर बोबडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : विधानसभा निवडणुकीला अवधी असला तरी इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. काँग्रेसमधून निलंबित डॉ. आशीष देशमुख यांनी थेट या पक्षाकडेच सावनेर येथून उमेदवारीची मागणी करून या येथील विद्यमान आमदार व माजी मंत्री सुनील केदार यांना आव्हान दिले आहे.
डॉ. देशमुख यांनी त्यांचे वडील व प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष रणजीत देशमुख यांचा अभीष्टचिंतन सोहळा २९ मे रोजी सावनेर येथे आयोजित केला आहे. या माध्यमातून काँग्रेसच्या जुन्या नेत्यांची जुळवाजुळव केली जात आहे.

भाजप-काँग्रेस असा राजकीय प्रवास असणारे डॉ. देशमुख २०१४ मध्ये काटोल मतदारसंघातून भाजपकडून विजयी झाले होते. पक्षांतर्गत मतभेदामुळे त्यांनी भाजप व आमदारकी दोन्ही सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र या पक्षातील नेत्यांशीही त्यांचे सूर जुळले नाहीत. राहुल गांधी, नाना पटोले या ज्येष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केल्याने त्यांना काँग्रेसने निलंबित केले होते. त्यांनी आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी काटोलऐवजी सावनेर मतदारसंघाची निवड केली. कारण १९८५ मध्ये येथून आशीष यांचे वडील रणजीत देशमुख निवडून आले होते. २००९ मध्ये खुद्द आशीष देशमुख यांनीही येथून भाजपकडून निवडणूक लढवली होती व पराभूत झाले होते. या भागात रणजीत देशमुख व आशीष देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अभीष्टचिंतन सोहोळ्याच्या निमित्ताने या सर्वांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे सावनेर हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुनील केदार यांचा गड मानला जातो. येथून ते सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. आशीष यांच्याकडून त्यांना आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… सीमाभागात एकीकरण समिती निष्प्रभ

हेही वाचा… चार वर्षांत दुसऱ्या विधीमंत्र्यावर गदा

सावनेरमध्ये केदार विरुद्ध देशमुख यांचे राजकीय वैर अनेक वर्षांपासून आहे. आता आशीष पुन्हा सावनेरच्या मैदानात उतरल्याने केदार-देशमुख वादाला नव्याने फोडणी दिली जाण्याची शक्यता आहे. आशीष यांच्या मागे भाजप असल्याचे बोलले जाते. मात्र त्यांनी ही बाब स्पष्टपणे नाकारली. मला काँग्रेसने निलंबित केले असले तरी मी इतर पक्षात गेलो नाही. निलंबन मागे घेऊन पुन्हा पक्षात घेण्याची काँग्रेसमध्ये परंपरा आहे. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनाही काँग्रेसने पुन्हा प्रवेश दिला. मी माझ्यावरील कारवाईबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यानंतर मला पक्षाकडून काहीच पत्र आले नाही. याचा अर्थ माझ्याा स्पष्टीकरणावर पक्ष समाधानी आहे, असे मी मानतो. त्यामुळेच मी पक्षाकडे सावनेरची उमेदवारी मागितली, असे डॉ. आशीष देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr ashish deshmukh trying to build up environment to fight election in saoner against sunil kedar print politics news asj