BJP vs Congress on Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत असल्याचं सांगून राजकीय पक्षांनी २०२४ मध्ये एकमेकांना लक्ष्य केलं. या वर्षीही हा संघर्ष असाच सुरू राहण्याची शक्यता आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आज सोमवारी (१४ एप्रिल) १३५ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने सत्ताधारी व विरोधकांनी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बाबासाहेबांच्या विचारधारेत स्वत:ला सामावून घेण्यासाठी भाजपा, त्यांचे सहयोगी पक्ष आणि विरोधकांमध्ये राजकीय स्पर्धाच लागली आहे.
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ‘अबकी बार ४०० पार’चा नारा दिला होता; तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील पक्ष पुन्हा सत्तेत आल्यास संविधान धोक्यात येईल, असा मुद्दा विरोधकांनी जोरकसपणे मांडला. त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालांवर दिसून आला. केंद्रात सलग दोन वेळा सत्ता उपभोगणाऱ्या पक्षाला २०२४ मध्ये स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला ३०० हून अधिक जागा मिळाल्या होत्या. या वेळच्या निवडणुकीत पक्षाला केवळ २४२ जागांवरच समाधान मानावं लागलं.
आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर डिसेंबरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी एक वक्तव्य केलं, ज्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला. केंद्रीय गृहमंत्र्यांचे वक्तव्य हा बाबासाहेबांचा अवमान असल्याचा आरोप करीत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, संसेदतील संघर्षाला चार महिने झाल्यानंतर आता सत्ताधारी एनडीए आघाडी आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीने बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, ज्यामध्ये मॅरेथॉनपासून सामूहिक भोजन, चर्चासत्रे आणि प्रस्तावना वाचनांपर्यंत विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.
आणखी वाचा : दलित, पीडित आणि गरीबांच्या प्रगतीत बाबासाहेबांची सर्वात मोठी भूमिका, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
भाजपाकडून आंबेडकरांच्या पुतळ्यांची स्वच्छता
आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला रविवारी भाजपाने देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची स्वच्छता मोहीम हाती घेतली. लखनौमध्ये सत्ताधारी पक्षाने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले; तर केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली पाटणामध्ये जय भीम पदयात्रा काढण्यात आली. सोमवारी भाजपा नेते व कार्यकर्ते आंबेडकरांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करतील आणि संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करतील. भाजपाच्या अंतर्गत सूत्रानुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चैत्यभूमीला भेट देतील, जिथे आंबेडकर यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले होते. भाजपाने १५ एप्रिलपासून २५ एप्रिलपर्यंत आंबेडकर यांच्या सन्मानार्थ विविध चर्चासत्रे आयोजित करण्याची योजना आखली आहे.
‘विरोधकांचा अपप्रचार खोडून काढणार’
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते गोपाल कृष्ण अग्रवाल म्हणाले, “भाजपने याआधीही आंबेडकर जयंती तेवढ्याच उत्साहाने साजरी केली आहे; परंतु यावेळी अधिक लक्ष दिले जात आहे. कारण- काँग्रेससारख्या विरोधी पक्षांनी भाजपाविरोधात संविधानाबाबत अपप्रचार केला आहे.” भाजपाच्या एका नेत्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले, “मागील एक वर्षापासून विरोधक संविधान आणि दलितांविषयी भरपूर बोलत आहेत. त्यामुळे भाजपाने यंदा अधिक भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कारण- या वर्षी बिहारमध्ये निवडणूक होणार आहे आणि २०२७ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश निवडणुकीसाठीही भाजपासाठी ती बाब फायदेशीर ठरणार आहे. उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव यांच्या नेतृत्वातील समाजवादी पार्टी भाजपा सरकारवर संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत आहे. त्यांचा अपप्रचार खोडून काढण्यासाठी पक्षाकडून बाबासाहेबांचे विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.”
भाजपाच्या मित्रपक्षांकडून सदस्य नोंदणी अभियान
उत्तर प्रदेशमधील भाजपाचे सहयोगी पक्ष आरएलडी आणि अपना दल सोमवारी सदस्य नोंदणी अभियान सुरू करणार आहेत. “आम्हाला ओबीसी-केंद्रित पक्ष म्हणून ओळखले जाते. पूर्व उत्तर प्रदेशमधील दलितांचा पक्षाला मोठा पाठिंबा मिळतो. त्यामुळेच आम्ही त्यांची एकजूट करण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान सुरू करीत आहोत, असे अपना दल पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. ते म्हणाले की, पक्षाच्या अध्यक्षा व केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल या शाहजहांपूरमधून सदस्य नोंदणी अभियान सुरू करतील. हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी (SC) राखीव आहे.
‘होय, आम्ही दलित आहोत’
आरएलडीचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी शनिवारी दिल्लीमध्ये आपल्या पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाची घोषणा केली. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समुदायाचे नेते नव्हते, तर त्यांचं कार्यक्षेत्र खूपच मोठं आहे”, असे चौधरी म्हणाले. जेडीयूचे अध्यक्ष व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी पाटणा येथे आयोजित केलेल्या भीम संवाद या कार्यक्रमात संविधानासाठी आंबेडकर यांच्या योगदानाचा उल्लेख केला. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या फलकावर डॉ. आंबेडकर, मुख्यमंत्री नितीश कुमार व जेडीयूच्या इतर नेत्यांचे फोटो होते. “होय, आम्ही दलित आहोत” असा मजकूरही या फलकांवर होता.
हेही वाचा : Waft Act 2025 : देशातील ‘या’ राज्यात लागू होणार नाही वक्फ कायदा? नेमकं काय आहे यामागचं कारण?
इंडिया आघाडीतील घटक पक्षांची काय रणनीती?
इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी केली आहे. समाजवादी पार्टीपाठोपाठ काँग्रेसनेही बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘स्वाभिमान सन्मान समारोह’ या कार्यक्रमाची तयारी केली आहे. या कार्यक्रमांद्वारे दलित समुदायातील प्रमुख व्यक्तींना सन्मानित करून, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा समाजवादी पार्टीचा प्रयत्न आहे. बाबासाहेब आंबेडकर वाहिनी आणि समाजवादी अनुसूचित जाती सेल यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी इटावा येथे शनिवारी आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे. लखनौच्या हजरतगंज चौकात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अखिलेश यादव हे सोमवारी अभिवादन करणार आहेत.
काँग्रेसकडून आंबेडकर जयंती साजरी करण्याचे आवाहन
काँग्रेसने नुकतेच संविधानावर आधारित ‘जय बापू, जय संविधान’ हे राष्ट्रीय स्तरावरील अभियान राबवले होते. आता पक्षाने देशभरातील सर्व नेत्यांना, तसेच कार्यकर्त्यांना आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्याचे आवाहन केले आहे. उत्तर प्रदेशमधील एका काँग्रेस नेत्याने सांगितले, “महामानवाच्या जयंतीनिमित्त प्रत्येक जिल्ह्यात पक्षाकडून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम प्रामुख्याने दलितबहुल भागांमध्ये होतील. प्रत्येक जिल्हा शाखेला या कार्यक्रमांचा अहवाल प्रदेश नेतृत्वाकडे पाठवावा लागेल”. दरम्यान, उत्तराखंडमध्ये काँग्रेसकडून सामूहिक भोजन आणि चर्चासत्रांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर झारखंडमधील रांची येथे काँग्रेसने मानवी साखळी तयार करण्याची योजना आखली आहे.