छत्रपती संभाजीनगर: संख्येने अधिक असणाऱ्या मराठा जातीमधील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ‘ओबीसी’ मध्ये समावेश करावा, या मागणीने जोर धरला असताना, जातीपेक्षा धर्मावर अधारित गर्दी जमावी असे प्रयत्न भाजपच्या नेत्यांकडून सुरू झाले आहेत. भाजपचे नेते व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी बागेश्वर धाम येथून येणार रामकथा सांगण्यासाठी धीरेंद्र महाराज यांना निमंत्रित केले आहे. ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान रामकथेचे आयोजन शहरात करण्याचे नियोजन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगर शहरातील आयोद्धानगरी भागात पाच लाख लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आल्याचा दावा आता केला जात आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. कराड यांनी शहरभर फलक लावले आहेत. या कार्यक्रमाचा डामडौल जाहिरातीतून दिसत असल्याने त्यावर टीकाही होऊ लागली आहे. पत्रकार निशिकांत भालेराव यांनी ‘दोन कोटी रुपये खर्चून बागेश्वर धाम बाबाला आणण्यापेक्षा ही रक्कम विकासकामाला खर्च केली तर बरे होईल’ अशी टीप्पणी समाजमाध्यमांवर केली. काही मराठा आंदोलकांनी हा कार्यक्रम उधळून लावू असा इशारा दिला आहे.

हेही वाचा… प्रफुल्ल पटेल लोकसभा निवडणूक लढणार?

सत्ताधारी पक्षातील आमदार आणि मंत्री धर्माच्या आधार घेऊन गर्दी व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत. काही महिन्यांपूर्वी आमदार प्रदीप जैस्वाल यांनीही शहरात पं. प्रदीप शर्मा यांचे ‘शिवमहापुराण’ हा कार्यक्रम अयोजित केला होता. कीर्तन – प्रवचन, रामकथा अशा उपक्रमांचा आणि निवडणुकांशी सहसंबंध जोडला जात आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही मराठवाड्यात विविध प्रकारच्या आधात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठकांच्या कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. शहरात महास्वच्छता उपक्रमाच्या वेळी धर्माधिकारी यांच्या कार्याचे कौतुक करण्यास मुख्यमंत्री आवर्जून हजर झाले होते. मराठवाड्यातील पहिले सहा मुख्यमंत्र्यांचे दौरे महाराजांच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी झाले होते. ही पार्श्वभूमी लक्षात घेता निवडणुकीपूर्वी पुन्हा धार्मिक वातावरण निर्माण करण्याची प्रक्रिया हाती घेतली जात असल्याचे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ॲड्. अभय टाकसाळ यांनी व्यक्त केले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी विकास प्रश्नावर लक्ष घातले असते तर बरे झाले असते. पिण्याचे पाणी हा प्रश्न जरी सोडवला तरी बरे वाटले असते. पण महाराज आणि बुआ- बाबांना आणून मतपेढीचे राजकारण केले जात असल्याचे मत ॲड्. टाकसाळ यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr bhagwat karad invited dhirendra maharaj to narrate the story of ram to gather crowds based on religion rather than caste for maratha reservation protest print politics news dvr
Show comments