सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगर: केंद्रात राज्यमंत्रिपद मिळाल्यावर कोणत्याही परिस्थितीत संभाजीनगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून जाण्याचा चंग बांधलेल्या डॉ. भागवत कराड यांना विविध विकास कामांच्या उद्घाटनाची आणि भूमिपूजनांचा घाई झाली आहे. यामुळेच पुढील दोन अडीच महिन्यांत जास्तीत जास्त कार्यक्रम आटपून मतदारांसमोर जाण्याची कसरत डॉ. कराड यांना करावी लागणार आहे.

शहरातील दोन औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या पुलासाठी ३७३७ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यास राष्ट्रीय महामार्ग विभागाने नकार दिल्यानंतर ही रक्कम कर्ज म्हणून उपलब्ध करुन देता येईल. मात्र, तशी राज्य सरकारची तयारी असावी, यासाठी प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सोमवारी सांगितले. या शिवाय विकास कामांच्या भूमीपूजन आणि उद्घाटनासाठी कोणते प्रकल्प हाती घेता येतील याचाही आढावा घेतला जात आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी पाईपव्दारे घरगुती गॅस पुरवठा होऊ शकतो काय, हेही तपासले. मात्र, ती प्रक्रिया लोकसभेपूर्वी पूर्ण होऊ शकणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरात बंद पाईपमधून घरगुती वापराचा गॅस पुरविण्यासाठी चार हजार कोटी रुपयांचे काम सुरू आहे. जी-२० च्या काळात हे काम काही दिवस बंद होते. आता या कामाला वेग देत ते तीन महिन्याऐवजी दीड महिन्यात पूर्ण करता येईल का, अशी विचारणा डॉ. कराड यांनी अधिकाऱ्यांना केली. पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते उखडले जाणार असल्याने सुरक्षा अनामत रक्कम म्हणून २७ कोटी रुपयांची मागणी महापालिकेने केली आहे. ही रक्कम कमी करण्याची विनंती अधिकाऱ्यांनी केली. त्याचबरोबर ही गॅस पाईपलाईन गोदावरी नदी पात्राच्या २० मीटर खालून जाणार असल्याने हे काम १५ फेब्रुवारीपर्यंत होऊ शकेल असे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. अहमदनगरजवळ डोंगराच्या भागातून ही पाईपलाईन येणार असल्याने शहरात गॅस पुरवठा होण्यास किमान तीन महिन्याचा वेळ लागू शकतो, असे अधिकाऱ्यांनी डॉ. कराड यांना सांगितले. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी या कामाचे उदघाटन होऊ शकत नाही, असे डॉ. करड यांना कळाले. तत्पूर्वी गोदावरी नदीतून २० मीटर खोल पाईप कसे आणले जात आहेत, हे दाखविण्यासाठी कार्यक्रमाचे अयोजन करू, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सूचविले.

शहरातील दोन औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा २८ किलोमीटरचा एकच एक पुल करण्यासाठी बऱ्याच बैठका घेतल्यानंतर या प्रकल्प पूर्ण करण्यास लागणारा निधी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून मिळणार नसल्याचे डॉ. कराड यांना कळविण्यात आले होते. त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळला गेल्याचा संदेश छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांपर्यंत गेला होता. आता पुन्हा तोच प्रकल्प राज्य सरकारने रस्ते विकास महामंडळाने हाती घ्यावा अशी बोलणी मंत्री दादा भुसे यांच्याबरोबर झाली असून तसा प्रस्ताव गेल्यास या प्रकल्पासाठी लागणारे कर्ज केंद्र सरकार राज्य सरकारला देऊ शकेल. तसे प्रयत्न करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ तसेच मेट्रोसाठीही केंद्र सरकारकडून निधी उलब्धतेसाठी प्रयत्न करू, असे डॉ. कराड यांनी सांगितले. निधी मिळविण्याच्या या कसरतीमध्ये ‘ पाठपुरावा’ करा, अशाा सूचना त्यांनी दिल्या.

शहराला दर आठ दिवसाने एकदा पाणीपुरवठा होतो. तो चार दिवसावर यावा म्हणून काही टाक्या बांधण्यासाठी तसेच नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी १९० कोटी रुयांची मंजूरी देण्यात आली होती. या प्रकल्पातील थोडेसे काम शिल्लक असल्याने पिण्याच्या पाण्याचा खंड अर्ध्यावर आणणाऱ्या योजनेचे उद्घाटन केले जाणारं आहे. तसेच शहरातील कामगारांसाठी एक हजार खाटांच्या रुग्णालयाचे उद्घाटनही लवकरच हाती घेतले जाणार असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. गेल्या काही दिवसापासून डॉ. कराड यांच्या कार्यशैलीत फरक जाणवत असून तो लाेकसभा निवडणुकीपूर्वीची घाई असल्याचे दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास ते इच्छूक आहेत.

खैरे- दानवे कोणीही विरोधात असतील तर सोपेच

मी उमेदवार असेन की नाही माहीत नाही. भाजपमध्ये हे सारे वरुन ठरते. मात्र, खैरे किंवा दानवे कोणी जरी उमेदवार असेल तर निवडणुकीत माझ्यासाठी साेपेच असेल असे डॉ. कराड यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr bhagwat karad is in a hurry to inaugurate various development works before election of lok sabha from the sambhajinagar constituency dvr
Show comments