लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती : सुमारे दहा वर्षांपूर्वी काँग्रेसने मेळघाट हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेतला खरा, पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. गेल्या निवडणुकीत तर काँग्रेसचे पक्ष चिन्हच नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही जागा सोडावी लागल्याने काँग्रेस च्या उमेदवारावर राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्याची वेळ आली. या निवडणुकीत काँग्रेसने नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. काँग्रेस समोर गतवैभव प्राप्त करण्याचे आव्हान आहे.

मेळघाट मतदारसंघातून काँग्रेस तर्फे इच्छुकांची मोठी यादी होती. काँग्रेसने अखेर डॉ. हेमंत चिमोटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. १९९५ पूर्वी मेळघाट हा मतदारसंघ काँग्रेसचा गड होता. १९९५ मध्ये पटल्या गुरुजी यांनी भाजपच्या उमेदवारीवर सर्वप्रथम हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यातून हिसकावून घेतला. त्यानंतर काँग्रेसला विजयासाठी बरीच मोठी प्रतीक्षा करावी लागली होती. २००९ मध्ये केवलराम काळे हे काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले. पण त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. केवलराम काळे यांनी सहा महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला.

आणखी वाचा-“पार्सल उमेदवार नको,” भाजपच्या दोन माजी आमदारांचा देवराव भोंगळे यांना विरोध

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला, पण मेळघाट मतदार संघातून त्यांना २१ हजार इतके मताधिक्य मिळाले होते. काँग्रेसचे बळवंत वानखडे यांना या मतदारसंघात मताधिक्य मिळू शकले नाही, ही खंत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आहे. बळवंत वानखडे निवडून आले, त्यामुळे काँग्रेसला नवीन ऊर्जा मिळाली आहे.

काँग्रेसने मेळघाट मधून यावेळी नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे. डॉ. हेमंत चिमोटे हे वैद्यक व्यावसायिक आहेत. त्यांच्या उमेदवारीचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले असले तरी, त्यांच्या विरोधात काँग्रेस मधून बंडखोरी होते का याकडे अनेकांचे लक्ष आहे. विद्यमान आमदार राजकुमार पटेल यांना महायुतीची उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे. ते आता कोणता झेंडा हाती घेतात याची उत्सुकता आहे. डॉ. हेमंत चिमोटे यांच्या उमेदवारीने मेळघाटात तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

आणखी वाचा- गडचिरोलीत काँग्रेसकडून मनोहर पोरेटी यांना संधी, वडेट्टीवार गटाचा वरचष्मा…

सहा महिन्यांपूर्वी काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या केवलराम काळे यांना उमेदवारी मिळावी यासाठी माजी खासदार नवनीत राणा यांनी हट्ट धरला होता. त्यांचा हट्ट पूर्ण झाला. मेळघाट मधून नवनीत राणा यांना तब्बल १ लाख १ हजार १५४ मते मिळाली होती. याच आधारावर त्यांनी भाजपला ही जागा मिळावी, यासाठी मोर्चेबांधणी केली. आता काँग्रेसचा नवा डाव कितपत यशस्वी होतो, याची उत्सुकता आहे.