Bond between Dr. Manmohan Singh and Atal Bihari Vajpayee: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांच्याशी निगडित जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. मुळचे राजकारणी नसलेले डॉ. मनमोहन सिंग योगायोगाने राजकारणात आले आणि त्यांनी भारताच्या आर्थिक धोरणांमध्ये आमूलाग्र असे ऐतिहासिक बदल घडवले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग हे पक्षाच्या पातळीवर एकमेकांचे विरोधक असले तरी त्यांच्यात ऋणानुबंध कसे होते, यावर द इंडियन एक्स्प्रेसने एक लेख प्रकाशित केला आहे. मनमोहन सिंग अडचणीत असताना वाजपेयींनी त्यांना वेळोवेळी सहकार्य केले होते.
१९९१ साली तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात डॉ. मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते. त्यांच्या पहिल्याच अर्थसंकल्पावर अटल बिहारी वाजपेयी यांनी खरपूस टीका करत शब्दांच्या बाणांनी मनमोहन सिंग यांना घायाळ केले. परंतु, तरीही या दोघांमधील संबंध सौहार्दपूर्ण राहिले. अटल बिहारी वाजपेयी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या अर्थसंकल्पाचे भाषण संसदेत फाडले आणि त्यावर कठोर टीका केली. या टीकेमुळे सिंग इतके दुखावले गेले की, त्यांनी थेट राजीनामा देण्याचा विचार केला होता.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या या निर्णयामुळे माजी पंतप्रधान नरसिंहरावही गोंधळून गेले. त्यांनी थेट वाजपेयींना फोन केला आणि डॉ. मनमोहन सिंग यांची समजूत घालण्यास सांगितले. यानंतर वाजपेयी यांनी मनमोहन सिंग यांची भेट घेतली. आपण केलेली टीका ही राजकीय भूमिका असून विरोधी पक्षाचे कर्तव्य आपण पार पाडल्याचे सांगितले. ही टीका वैयक्तिक नसून राजकीय आहे, अशी समजूत घातल्यानंतर मनमोहन सिंग यांनी राजीनामा देण्याचा विचार बदलला. २०१८ साली अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले, त्यावेळी द हिंदू वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनमोहन सिंग म्हणाले की, भाजपा नेते अटल बिहारी वाजपेयींमध्ये नेहरूंचे गुण पाहायला मिळत.
या मुलाखतीमध्ये मनमोहन सिंग म्हणाले, वाजपेयी एक महान भारतीय आणि महान पंतप्रधान होते. त्यांची भारताबद्दलची संकल्पना ही नेहरूंच्या दृष्टिकोनाशी जवळीक साधणारी होती. हा वारसा जपला गेला पाहिजे, असे मला वाटते. राजकारणात नेते काय बोलतात यापेक्षा ते कृतीमध्ये काय करतात, यावरून त्यांना जोखले गेले पाहिजे, असेही मनमोहन सिंग त्यावेळी म्हणाले होते.
१९९१ साली जेव्हा मनमोहन सिंग पहिल्यांदा अर्थमंत्री झाले, तेव्हा ते एक अनुभवी अर्थतज्ज्ञ होते, मात्र राजकारणी म्हणून ते नवखे होते. १९९१ साली निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा आणि परकीय चलन तुटवड्याचा त्यांना सामना करावा लागला होता. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी उदारीकरणाचा मार्ग अवलंबला, ज्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. आपल्या पहिल्याच भाषणात आर्थिक सुधारणांबाबत मनमोहन सिंग म्हणाले की, “भारताने योग्य मार्गावर जाण्याची वेळ आता आली आहे. हे करत असताना मी प्रत्येक हल्ल्याचा सामना करण्यास तयार आहे.” भाषणाच्या शेवटाला कवी बिस्मिल यांच्या ‘सरफरोशी की तमन्ना’ या रचनेतील ओळी उद्धृत केल्या.
मनमोहन सिंग यांचे भाषण झाल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी खोचक टीका करताना म्हटले की, अर्थमंत्री ‘सरफरोशी की तमन्ना’ म्हणत विरोधकांशी लढणार आहेत. या वाक्यानंतर संसदेत हशा पिकला. यानंतर ते म्हणाले की, एकमेकांशी लढण्यापेक्षा देशावर संकट कोसळले आहे, त्याविरोधात लढण्याची गरज आहे. मनमोहन सिंग त्यावेळी म्हणाले की, नव्या आर्थिक धोरणांबाबत वाजपेयी आणि आडवणी यांच्याशीही सल्लामसलत केले गेले. त्यांनी उदारीकरणाच्या धोरणाबाबत सहानुभूती व्यक्त केली. तसेच विरोधकांच्या टीकेनंतर वाजपेयींनी मनमोहन सिंग यांचे सांत्वन करताना म्हटले, “डॉ. सिंग तुम्हाला कणखर व्हावे लागेल, कातडी जाड करा. आम्ही जरी तुमचे समर्थन करत नसू तरी तुम्ही खंबीरपणे आपली वाटचाल सुरू ठेवली पाहिजे.”
हे ही वाचा >> मनमोहन सिंग आणि पंतप्रधान मोदींनी एकमेकांना कसं लक्ष्य केलं?
२००४ साली जेव्हा डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी त्यांच्या आधीचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे परराष्ट्र धोरण पुढेही कायम ठेवले. भारत-अमेरिका यांच्यातील अणुकरारासाठी त्यांनी अमेरिकेशी संपर्क साधला. २००८ साली अणुकरारावरून डावे पक्ष आणि भाजपाने केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. त्यावेळीही मनमोहन सिंग यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे मदतीचे आवाहन केले. त्यावेळी प्रकृतीच्या कारणास्तव वाजपेयी राजकारणातून निवृत्त झाले होते. डॉ. सिंग यांनी त्यांना भीष्म पितामह अशी उपमा दिली.
२००८ सालीच राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर अभिनंदनपर प्रस्तावादरम्यान बोलत असताना डॉ. सिंग यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचे कौतुक केले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नवाझ शरीफ यांनी चांगले प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.
प्रकृतीच्या कारणास्तव अटल बिहारी वाजपेयी राजकारणातून निवृत्त झाले होते, तेव्हा २५ डिसेंबर २००७ रोजी वाढदिवसानिमित्त डॉ. सिंग आणि वाजपेयी यांची समोरासमोर शेवटची भेट झाली. त्यानंतर पुढची सात वर्ष डॉ. मनमोहन सिंग यांना वाजपेयींशी सल्लामसलत करण्याची संधी मिळाली नसली तरी त्यांनी भाजपाचे नेते लालकृष्ण आडवाणी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्याशी सुसंवाद कायम ठेवला.