राजकारणात यशस्वी होण्यासाठी कर्तृत्वाबरोबरच नशिबाचीही साथ आवश्यक असते. धुळे लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या डॉ. शोभा बच्छाव खरोखरच नशीबवान म्हणाव्या लागतील. ध्यानीमनी नसताना त्यांना अचानक उमेदवारी जाहीर होते काय आणि सलग दोनवेळा विजयी झालेल्या डॉ. सुभाष भामरे यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवारावर त्या विजय मिळवितात काय, सारेच चकित करणारे. अर्थात डॉ. बच्छाव यांना खासदार होण्याआधीही राजकारणात नशिबाने कायमच साथ दिली आहे. मूळ वैद्याकीय व्यवसाय सांभाळताना सामाजिक सेवेची आवड असलेल्या डॉ. शोभा बच्छाव १९९२ मध्ये सक्रिय राजकारणात आल्या. नाशिकच्या पहिल्या महापौर म्हणून कार्यरत असताना कार्यकाल एक वर्षाचा होता. त्यावेळी महापौर परिषदेची मागणी मान्य करुन राज्य शासनाने महापौरपदाचा कार्यकाल अडीच वर्षाचा केल्याने डॉ. बच्छाव यांना साडेतीन वर्ष मिळाली. ही साडेतीन वर्षे संपत आली असतानाच विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहितेमुळे त्यांना महापौरपदी वाढीव सहा महिने मिळाले.
महापौरपदानंतर नाशिक मतदारसंघातून त्यांनी भाजपचे दिग्गज उमेदवार डॉ. दौलतराव आहेर यांचा पराभव करण्याची किमया केली. त्यानंतर विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात २००८ मध्ये आरोग्य राज्यमंत्रीपदही त्यांच्याकडे चालून आले. अशाप्रकारे डॉ. बच्छाव यांना नशिबाने कायमच साथ दिली. धुळ्यात काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नव्हता. मूळच्या नाशिकच्या पण माहेर धुळ्याचे असल्याने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेवरून डॉ. बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली. धुळ्यातील काँग्रेसची सारी नेतेमंडळी विरोधात होती. सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर राहूनही केवळ मालेगावमधील १ लाख ९४ हजारांच्या मताधिक्याने केवळ तीन हजार मतांनी विजय मिळविला. नाशिकमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकपदापासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द आता धुळ्याच्या खासदारकीपर्यंत येऊन ठेपली आहे.