नीलेश पवार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नंदुरबारचे प्रतिनिधित्व करणारे डाॅ. विजयकुमार गावित यांना तब्बल आठ वर्षानंतर मंत्रीपदाची संधी मिळाली असली तरी आदिवासी विकास विभागासह संजय गांधी योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपनेच आता त्यांना मंत्री केल्याने विरोधकांना हा आयताच मुद्दा मिळणार आहे.

नंदुरबार मतदार संघातून १९९५ पासून अपक्ष म्हणून लढणारे डॉ. गावित सलग सहाव्यांदा विजयी झाले आहेत. १९९५ मध्ये डॉ. गावित यांना तत्कालीन युती शासनात राज्यमंत्रीपद मिळाले होते. पुढे १९९९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर २०१४ पर्यत अनेक महत्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. यात प्रामुख्याने आदिवासी विकास विभाग, पर्यटन, वैद्यकीय शिक्षण, फलोत्पादन यांचा समावेश होता. याच दरम्यान त्यांच्यावर तत्कालीन विरोधक शिवसेना-भाजपकडून आदिवासी विकास विभागात भ्रष्टाचार केल्याचे आरोप झाले. नंदुरबारमधील संजय गाधी निराधार योजनेतील गैरव्यवहारातही नाव आल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला डाग लागला. दरम्यानच्या काळात त्यांची कन्या डॉ. हिना गावित या नंदुरबार लोकसभा मतदार संघातून भाजपच्या खासदार झाल्या.

पाठोपाठ २०१४ मध्ये डॉ. विजयकुमार गावित यांनीही त्यांच्यावर आरोप करणाऱ्या भाजपमध्येच प्रवेश करुन विजय मिळवला. परंतु, आपणच भ्रष्टाचाराचे आरोप केले असताना त्यांना मंत्रीपद द्यावे कसे, हा प्रश्न भाजपला पडला. त्यामुळे डॉ. विजयकुमार गावित यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले होते.डॉ. हिना गावित दुसऱ्यांदा खासदार झाल्यांतर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात हमखास राज्यमंत्रीपद मिळणार, असे मानले जात असताना नाशिक जिल्ह्यातील डाॅ. भारती पवार यांची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्याने गावित कुटुंबियात नाराजी होती. मुळातच जिल्ह्यात भाजपची पाळेमुळे बळकट करण्यात डॉ. विजयकुमार गावितांचा मोठा वाटा मानला जातो.

राज्यात आदिवासी समाजाचा सर्वात प्रबळ चेहरा म्हणून त्यांची ओळख असल्याने आदिवासी भागात त्यांचा पक्षाला लाभ होऊ शकतो, हे लक्षात घेऊन भाजपने त्यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये स्थान दिले असावे. परंतु, विरोधकांनाही त्यामुळे आरोपांच्या फैरी झाडण्याची संधी मिळाली आहे.गावित कुटूंब संपूर्णपणे राजकारणी कुटूंब झाले आहे. डाॅ. विजयकुमार यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्या, मोठी मुलगी डाॅ. हिना या खासदार आणि लहान मुलगी सुप्रिया या जिल्हा परिषद सदस्य आहेत. डॉ. गावित काही काळ सत्तेपासून दूर राहिल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवरील त्यांचे वर्चस्व कमी झाले. जिल्ह्यातील शिंदे गटाला सोबत घेऊन जिल्हा परिषदेत सत्तांतर घडवून आपला राजकीय करिष्मा पुन्हा एकदा सिध्द करण्याची नक्कीच त्यांची इच्छा असेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr vijay kumar gawit is the trible face in eknath shinde cabinet print politics news pkd