नीरज राऊत
शिवसेना सदस्यांमधील अंतर्गत वाद उफाळून आल्याने तहकूब झालेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवार ७ नोव्हेंबरला होणार असून या सभेत शिवसेना सदस्यांची राजकीय भूमिका स्पष्ट होणार आहे. त्यामुळे येत्या १०-१२ दिवसात होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहे. अध्यक्षपद आपल्याकडेच राखण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र राहणार की शिंदे गट भाजपला पाठिंबा देऊन भाजपचा अध्यक्ष निवडून आणणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
पालघर जिल्हा परिषदेच्या १८ ऑगस्टच्या सभेत मे महिन्यात झालेल्या सभेचे इतिवृत्त लिखाणात झालेल्या चुकांबाबत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. तर मुंबई महानगर क्षेत्रांतर्गत विकास कामांबाबतचा विषय सर्वसाधारण सभेत पुढे ठेवताना तांत्रिक मुद्द्यांवर इतर विकास कामांमध्ये सर्व सभासदांना समान वाटप झाले नसल्याने आरोप – प्रत्यारोप होऊन गोंधळ झाला होता. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेकडे असताना आरोप करून आक्षेप घेणारे शिवसेनेचे गटनेते तसेच शिवसेनेचे काही सदस्य आक्रमक राहिले होते. याला भाजपाच्या व बहुजन विकास आघाडीच्या काही सदस्यांनी साथ दिली होती. १८ ऑगस्टच्या सभेतील १४ विषयांपैकी मागील सभेचे इतिवृत्त व आरोग्य विषय काही मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर भोजनानंतर ही सभा तहकूब करण्यात आली होती.
हेही वाचा… ‘विचार मंथन’ शिबिरात श्रीमंतीचे प्रदर्शन करणाऱ्यांना अजित पवारांनी सुनावले
दरम्यानच्या काळात जिल्हा परिषद अध्यक्ष व शिवसेनेचे काही सदस्य यांनी शिंदे गटात (बाळासाहेबांची शिवसेना) प्रवेश केला असून २० सदस्य असणाऱ्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटामध्ये जवळपास समसमान विभागणी झाली आहे. शिवाय राज्यात शिंदे गट व भाजप एकत्र असल्याने तहकूब झालेली सर्वसाधारण सभा पुन्हा चालवताना राज्यातील सत्तास्थानी असलेल्या दोन पक्षांचे सदस्य जिल्हा परिषदेत कशी भूमिका घेतात हे पुढील राजकीय डावपेचांच्या दृटीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
हेही वाचा… अजित पवारांनी बारामतीसाठी मंजूर केलेल्या २४५ कोटींच्या विकासकामांना चंद्राकांत पाटील यांची कात्री
पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा वाढविलेला कार्यकाळ १७ नोव्हेंबरला संपत असून यापूर्वी या पदांसाठी निवडणूक होणे अपेक्षित आहे. शिवसेनेचे जिल्हा परिषदेमधील संख्याबळ २० असले तरी त्यापैकी फक्त १५ सदस्यांचा गट नोंदणीकृत राहिलेला आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यास भाजपसोबत युती करून सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेचे सदस्य एकसंघ राहिल्यास राष्ट्रवादी व इतर मित्र पक्षांसोबत जिल्हा परिषदेतील सत्ता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रवादीमध्ये कायम राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सोमवारी होणारी सर्वसाधारण सभा ही अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे. या सर्वसाधारण बैठकीच्या नियोजनात सर्व सदस्यांना एकत्र करण्याचे छुपे उद्दिष्ट असून त्यानंतर काही सदस्यांना निवडणुकीपूर्वी सहलीसाठी बाहेरगावी घेऊन जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा… विद्यापीठ निवडणुकीत राज्य सत्ताकारणातील प्रयोगाच्या हालचाली
अध्यक्षपदावर भाजपाचा दावा
शिवसेनेत फूट पडल्याने शिंदे गटाची संख्या कमी होऊन असून १३ सदस्यांचा गट असणाऱ्या भाजपाने अध्यक्षपदावर दावा केला असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. सत्तेत बसण्यासाठी भाजपा शिवसेनेच्या शिंदे गटाचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस किंवा बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा घेईल अशी शक्यता आहे.