कल्याण : विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपचे डोंबिवलीत आमदार रविंद्र चव्हाण यांना आता पक्षात मोठे स्थान मिळेल अशी चर्चा असली तरी मंत्री मंडळातून डावलले गेल्यामुळे सत्तेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात ठाणे, पालघरसह कोकण प्रांतात स्वत:ची राजकीय पकड निर्माण करु पहाणाऱ्या चव्हाण यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा आता रंगली आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असताना चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासारखे प्रभावी मंत्रीपद देऊन भाजपने त्यांचे मंत्रीमंडळात ‘वजन’ वाढविले होते. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पद आणि पक्षाच्या कोकण प्रांताची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. या संपूर्ण पट्टयात भाजपला मोठे यश मिळाल्याने चव्हाण यांना मंत्री मंडळात महत्वाचे स्थान मिळेल अशी आशा त्यांच्या समर्थकांना वाटत होती. मात्र पक्ष श्रेष्ठींनी त्यांना सत्तापदापासून दूर करण्याचा निर्णय घेतल्याने यापुढे चव्हाण यांना पक्षाच्या कामातच स्वत:ला व्यग्र ठेवावे लागेल अशी चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, ठाणे जिल्ह्यावर एकेकाळी स्वत:चे राजकीय वर्चस्व निर्माण करणाऱ्या गणेश नाईक यांना मंत्रीपद देऊन भाजपने त्यांना पुन्हा एकदा जिल्ह्यातील राजकीय प्रवाहात सक्रिय करण्याचे संकेत दिले आहेत.

आणखी वाचा-डॉ. भोयर यांना मंत्रिपद; इतरांची नाराजी, पण कुणबी-तेली वादाचा समन्वय

मंत्री मंडळातील महत्वाच्या स्थानामुळे चव्हाण यांनी गेल्या दहा वर्षात कोकण प्रदेशात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे हातखंडे वापरले. यामध्ये चव्हाण यांना मोठे यश मिळाले देखील मात्र त्यांच्या मंत्री पदाचा फारसा उपयोग कल्याण, डोंबिवली तसेच आसपासच्या शहरांना धोरणात्मक आणि विकासाच्या पातळीवर झाल्याचे दिसले नाही अशी नाराजी एका मोठया वर्गातून व्यक्त होत आहे. डोंबिवली या स्वत:च्या मतदारसंघातही विकासाच्या आघाडीवर स्वत:ची वेगळी छाप सोडण्यात चव्हाण यांना तितकेसे यश आले नाही. त्यांच्या मंत्री पदाचा उपयोग पक्षाला यश मिळवून देण्यात झाला असला तरी स्वत:च्या मतदारसंघात आणि अगदी कल्याण पट्टीतील परिसरातही त्यांना धोरणात्मक कामांचा प्रभाव राखता आला नाही, अशी टिका आता त्यांच्यावर दबक्या आवाजात होताना दिसत आहे.

मंत्री पदाची आशेवर पाणी ?

महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार निश्चितीच्या चर्चेतही समाजमाध्यमविरांनी मराठा चेहरा म्हणून थेट रविंद्र चव्हाण यांचे नाव चालविले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये चव्हाण ओळखले जातात. फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातच चव्हाणांची राजकीय ताकद वाढली. एकनाथ शिंदे यांच्या सुरत, गुवहाटी प्रवासात ते भाजपकडून त्यांच्यासोबत होते. पक्षासाठी आवश्यक असलेल्या अशा मोहीमा यशस्वी करण्यात चव्हाण आघाडीवर दिसायचे. पालघर जिल्ह्यात हितेंद्र ठाकूरांच्या वर्चस्वाला शह देताना खासदार आणि आमदार निवडणूक आणताना चव्हाण यांच्या दातृत्वाचे नवे रंग दिसले.

आणखी वाचा-One Nation, One Election Bill : ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाविरोधातील लढाईत विरोधकांची सरशी? वाचा नियम काय सांगतात

मंत्रीपदाच्या माध्यमातून ठाणेच नव्हे तर संपूर्ण कोकण पट्टीत त्यांनी स्वत:चा वरचष्मा निर्माण केला. विधानसभा निवडणुकीत पक्षाला अभूतपुर्व यश मिळाल्याने चव्हाण यांचे वजन आणखी वाढले. मंत्री मंडळात त्यांना वजनदार जागा मिळेल या आशेवर त्यांचे समर्थक होते. अशातच त्यांची पक्षात मोठया पदावर नियुक्ती होईल अशी चर्चा रंगली. त्यांचे संघटन कौशल्य पहाता राज्य भाजपची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाईल अशी चर्चा सुरु असतानाही चव्हाण यांच्या समर्थकांना मात्र ते मंत्री होतील अशी आशा वाटत होती. ‘साहेब खासगी विमानाने नागपूरला शपथ घेण्यासाठी जाणार’ अशा चर्चाही शहरात होती. असे असताना ठाणे जिल्ह्यातून गणेश नाईक यांना संधी देताना पक्षाने चव्हाण यांना बाहेर बसविल्याने त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात चव्हाण यांच्याकडे राज्यमंत्री पद होते. या काळात त्यांना कल्याण डोंबिवली पट्टयाच्या विकासात फारसा प्रभाव पाडता आला नाही. एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रभावापुढे त्यांचे मंत्रीपद झाकोळले गेल्याचे चित्र होते. महायुतीचे सरकार सत्तेवर येताच चव्हाण यांना थेट सार्वजनिक बांधकाम विभागासारखे वजनदार मंत्री पद मिळाले. मात्र शिंदे पिता-पुत्रांनी चव्हाण यांना त्यांच्या मतदारसंघातही फारसे प्रभावी ठरु दिले नाही. या काळात चव्हाण हे डोंबिवलीत कमी आणि कोकणातच अधिक दिसायचे. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाचा शहराला काय उपयोग असा सवाल उपस्थित केला जात असे. डोंबिवलीतील काही संस्था पदाधिकाऱ्यांशी याविषयी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

आमदार रवींद्र चव्हाण यांना मंत्री पद मिळाले नसल्याने नाराज नाहीत. चव्हाण पक्षातील चौकटबध्द विश्वासाने काम करणारे कार्यकर्ते आहेत. संघटना वाढविणे, शत प्रतिशत भाजपसाठी त्यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. -शशिकांत कांबळे, प्रदेश नेते, भाजप.

Story img Loader