महेश सरलष्कर
ग्वाल्हेर (म.प्र.) : मध्य प्रदेशच्या चंबळ-ग्वाल्हेर पट्ट्यात सगळयांचे लक्ष केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे वेधले गेले आहे. २०१८च्या विधानसभा निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती झाली तर भाजप राज्यातील सत्ता राखण्यात कदाचित यशस्वी होईल असेही मानले जात आहे. पण, काही मतदारसंघांत दोन्ही पक्षांकडून उतरवल्या गेलेल्या उमेदवारांमुळे इथल्या लढतींमधील चुरस आणखी वाढली आहे.
२०१८ मध्ये या पट्ट्यातील ३४ पैकी २७ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. मुरैना आणि ग्वाल्हेर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसने ११ जागा मिळवल्या होत्या. या पट्ट्यात विजयी झालेला पक्ष राज्यातही सत्तेवर येतो असे म्हटले जाते. २०१८ मध्ये काँग्रेसला यश मिळाले होते, मध्य प्रदेशमध्ये सत्ताबदल होऊन काँग्रेसच्या हाती सत्ता आली होती. पण, पाच वर्षांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये होते, आता ते भाजपमध्ये असून त्यांच्या मर्जीनुसार तिकीट वाटपही झालेले आहे. त्यामुळे या पट्ट्यातील यशापयशाची जबाबदारी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर असेल, असे समर्थकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा… चंद्राबाबू नायडू यांना अटक; पत्नी भुवनेश्वरी यांच्याकडून राज्यभरात यात्रा, अटकेचा केला निषेध
इथे उमेदवार निवडीमुळे मतदारांमध्ये नाराजी असल्याचेही दिसते. चंबळ खोऱ्यातील मुरैना मतदारसंघामध्ये ज्योतिरादित्य शिंदेंचे समर्थक रघुराज सिंह कन्साना यांना उमेदवारी दिली असून २०२० च्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदेसोबत भाजपमध्ये गेलेल्या २२ आमदारांमध्ये रघुराज यांचाही समावेश होता. पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या राकेश मावई यांनी त्यांचा पराभव केला होता. पण, यावेळी काँग्रेसने मावई यांना उमेदवारी दिलेली नाही. इथे कमकुवत दिनेश गुर्जर यांना उमेदवारी दिली आहे. इथे तगडे उमेदवार मानले गेलेले माजी मंत्री रुस्तम सिंह कन्साना यांना भाजपनेही तिकीट दिले नाही. त्यांनी ‘बसप’मध्ये प्रवेश केला असून उमेदवारीही मिळवली आहे. हे तीनही उमेदवार गुर्जर असले तरी मतदारांचा कल रुस्तम सिंह यांच्याकडे असल्याचे दिसते. ज्योतिरादित्यांच्या आग्रहामुळे मुरैनामध्ये भाजपने कुमकुवत उमेदवार रिंगणात उतरवल्याची चर्चा रंगली आहे.
हेही वाचा… मराठा आरक्षण प्रश्नी तूर्तास हस्तक्षेप करण्यास केंद्राचा नकार ?
ग्वाल्हेर-पूर्व मतदारसंघामध्ये भाजपने राजघराण्याशी संबंधित असलेल्या माया सिंह यांना उमेदवारी दिली आहे. माया सिंह या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मामी आहेत. पण, इथे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मामींना उमेदवारी दिल्यामुळे ज्योतिरादित्यांचा नाइलाज झाल्याचे सांगितले जाते. २०२० च्या पोटनिवडणुकीत ज्योतिरादित्य यांचे समर्थक मुन्नालाल गोयल यांनी काँग्रेसचे उमेदवार सतीश सिकरवार यांचा पराभव केला होता. तरीही यावेळी गोयल यांना डावलले गेले. २०१८ मध्ये याच दोन उमेदवारांमध्ये लढत झाली होती. तेव्हा गोयल काँग्रेसकडून तर सिकरवार भाजपकडून लढले होते. पोटनिवडणुकीत दोन्ही उमेदवारांच्या पक्षांची अदलाबदली झाली होती. दोन्ही निवडणुकांमध्ये गोयल विजयी झाले होते तरीही भाजपने यावेळी माया सिंह यांना मैदानात उतरवले आहे. इथे ज्योतिरादित्य शिंदेंचे काही समर्थक सिकरवार यांच्यासाठी छुपा प्रचार करत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे इथे भाजप आणि काँग्रेसमधील लढाई लक्षवेधी झालेली आहे.
हेही वाचा… माझ्यामध्ये खरे बोलण्याचे धाडस – मध्य प्रदेशचे गृहमंत्री व मुख्यमंत्रीपदाचे स्पर्धक नरोत्तम मिश्रा
काँग्रेसमध्येही उमेदवारांच्या निवडीवरून वाद चिघळल्यामुळे चार मतदारसंघांमध्ये पक्षाला नवे उमेदवार द्यावे लागले. त्यामध्ये मुरैना जिल्ह्यातील सुमावली मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार अजब सिंह कुशवाह यांना वगळून काँग्रेसने कुलदीप सिकरवार यांना उमेदवारी दिली होती. कुशवाह यांनी बहुजन समाज पक्षात जाण्याचा इशारा दिल्यानंतर सिकरवार यांना काँग्रेसने डच्चू दिला. काँग्रेस नेत्यांनी विश्वासघात केल्याचा आरोप करत सिकरवार यांनी पक्ष सोडला, आता ते ‘बसप’कडून उमेदवार असतील. भाजपकडून ज्योतिरादित्य शिंदेंचे निष्ठावान एदलसिंह कन्साना यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. ज्योतिरादित्य यांच्यासोबत एदलसिंह काँग्रेससोडून भाजपमध्ये गेले. २०२० मध्ये पोटनिवडणुकीत त्यांचा अजबसिंह कुशवाह यांनी पराभूत केले होते. तरीही यावेळी ज्योतिरादित्य यांनी एदलसिंह यांनाच उमेदवारी दिली. पण, काँग्रेसच्या दोन्ही आजी-माजी उमेदवारांमधील भांडणाचा एदलसिंह यांना लाभ मिळेल असे मानले जात आहे.
दतिया विधानसभा मतदारसंघामध्येही काँग्रेसने उमेदवार बदलला. हे प्रकरण तर राहुल गांधींपर्यंत पोहोचले होते. माजी संघ प्रचारक अवधेश नायक यांनी भाजपमध्ये असताना गांधी कुटुंबावर टीका केली होती. त्याची चित्रफीत काँग्रेसचे इच्छुक राजेंद्र भारती यांच्या समर्थकांनी दिल्लीपर्यंत पोहोचवली असे बोलले जाते. मग, दिल्लीतून चक्रे फिरली, आणि दतियातील काँग्रेसचे एकमेव उमेदवार राजेंद्र भारती यांना पुन्हा उमेदवारी दिली गेली. उमेदवारांच्या निवडीमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रचंड रस्सीखेच आणि भांडणे झाली. त्यानंतर झालेल्या उमेदवार बदलांमुळे आता दोन्ही पक्षांसाठी विजयाची समान संधी मिळाली आहे. चंबळ-ग्वाल्हेर पट्ट्यात आता तरी लढाई एकतर्फी नसल्याचे दिसत आहे.