गडचिरोली : अजित पवारांच्या बंडामुळे राज्यात राजकीय भूकंप आला आहे. याचे हादरे गडचिरोलीलादेखील बसत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्रीपदाची शपत घेताच गडचिरोली भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार आणि एक खासदार असताना इतर पक्षातील नेत्याची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. हा निर्णय घेताना जिल्ह्यातील एकाही नेत्याला विश्वासात न घेतल्याने ते खाजगीत नाराजी व्यक्त करीत आहेत.
गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात सर्वात वरिष्ठ नेते म्हणून धर्मरावबाबा आत्राम यांची ओळख आहे. १९९० साली अहेरी विधानसभेतून निवडून आल्यानंतर ते राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणाचे सूत्र कायम अहेरी येथील राजघराण्यातून हलविल्या जातात. त्याच राजघराण्यातून धर्मरावबाबा येतात. त्यांचे राजकीय वलय दुर्लक्षित करण्यासारखे नसल्याने त्यांना तीनदा राज्यमंत्री आणि आता कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली. परंतु यावेळी अजित पवारांसोबत भाजप-शिवसेना सरकारमध्ये त्यांना स्थान मिळाल्याने गडचिरोलीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे वळण घेणार असल्याची चर्चा आहे. यात सर्वाधिक अस्वस्थता भाजपच्या गोटात आहे. मात्र, वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्णयावर उघडपणे बोलण्यास ते तयार नाही.
हेही वाचा – पुण्यातील कट्टर प्रतिस्पर्धी आता एकत्र
मंत्रिमंडळ विस्तारात शेवटी का होईना आम्हाला स्थान मिळणार अशी आशा आमदार कृष्णा गजबे आणि डॉ. देवराव होळी यांना होती. तसा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा केला आहे. तर दुसरीकडे धर्मरावबाबांनी येणारी लोकसभा लढविणार असे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपचे खासदार अशोक नेते यांची चिंता वाढली आहे. अहेरी विधानसभेतदेखील मंत्री आत्राम यांचे पुतणे भाजपचे नेते माजी राज्यमंत्री अम्ब्रीश आत्राम यांची उमेदवारीदेखील धोक्यात आली आहे. मागील वेळेस मोदी लाटेत धर्मरावबाबांनी त्यांचा पराभव केला होता. यंदा बाबांच्या कन्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम (हलगेकर) यांनी अहेरी विधानसभा लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे बाबा त्याही जागेवर दावा करणार आहेत. अशा स्थितीत भाजपकडून अम्ब्रीश आत्राम यांना उमेदवारीसाठी नकार मिळू शकते. एकंदरीत रविवारची राजकीय घडमोड भाजप नेत्यांनाच अडचणीत आणणारी आहे. अशी चर्चा सध्या जिल्ह्यात आहे.
हेही वाचा – काँग्रेसला अजून तरी फुटीचे ग्रहण नाही
खासदार अशोक नेतेंची उमेदवारी धोक्यात?
गडचिरोली-चिमूर लोकसभा मागील दहा वर्षांपासून भाजपकडे आहे. मर्यादित जनसंपर्क आणि सत्ताविरोधी वातावरणाचा फटका यंदा खासदार अशोक नेते यांना बसू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर शंका उपस्थित करणारी चर्चा वर्षभरापासून भाजपच्याच गोटात होती. त्यात धर्मरावबाबांना भाजप उमेदवारी देणार अशी चर्चादेखील होती. रविवारच्या मंत्रिमंडळविस्तारात बाबांना स्थान मिळाल्याने अशोक नेते यांची उमेदवारी संकटात सापडली आहे. त्यामुळे लोकसभेसाठी धर्मरावबाबा आत्राम भाजपचे पुढचे उमेदवार राहणार अशी चर्चा कालपासून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे.