नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अधिकाधिक जागा जिंकायच्या असतील तर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मैदानात उतरले पाहिजे, असा संदेश या नेत्यांना देण्यात आला होता. पण, पराभवाच्या भीतीने बहुसंख्य नेत्यांनी काढता पाय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे अपवाद ठरले आहेत.
महाराष्ट्रातही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा-गोंदिया, विधासभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर, सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची अपेक्षा पक्षामध्ये व्यक्त करण्यात आली होती. पण, यापैकी एकानेही निवडणुकीत उतरण्याचे धाडस दाखवले नाही. हे नेते स्वतःपेक्षा आपल्या वारसांसाठी किंवा निष्ठावानांसाठी दिल्लीत येऊन केंद्रीय नेतृत्वाकडे बोलणी करत असल्याचे दिसले.
हेही वाचा… महायुतीकडून परभणीसाठी महादेव जानकर यांना उमेदवारी?
गेल्या वेळी नाना पटोले यांनी उत्साहात नागपूरमधून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. पाच वर्षांपूर्वीचा पटोलेंमधील जोश टिकला नसल्याचे पाहायला मिळाले. भंडारा-गोंदियामधून भाजपने पुन्हा सुनील मेंढे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. आपल्याच मतदारसंघामध्ये पराभव झाला तर राज्यातही किंमत राहणार नाही. शिवाय, लोकसभा निवडणूक जिंकली तरी दिल्लीत जाऊन काय करणार, असाही विचार केला जात असल्यानेही नाना पटोलेंसह इतर नेत्यांचा लोकसभा निवडणूक टाळण्याकडे कल असल्याचे दिसले. पटालोंनी निष्ठावान प्रशांत पडोळेंना उमेदवारी मिळवून दिली.
दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये नाना पटोले व विजय वडेट्टीवार यांनीच निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी केंद्रीय नेतृत्वाने केली होती. चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीवर चर्चा करताना विजय वडेट्टीवारांनी ही जागा लढवावी अशी चर्चा झाल्याचे समजते. पण, वडेट्टीवारांनी कन्या शिवानी वडेट्टीवार यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी जिवाचे रान केले. विजय वडेट्टीवारांनी नकार दिल्याने अखेर धानोरकरांना उमेदवारी देण्यात आली. नांदेडमध्ये अशोक चव्हाण थेट भाजपमध्ये जाऊन बसल्यामुळे तिथे काँग्रेसला नवा उमेदवार शोधावा लागला. सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे पहिल्यापासून कन्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांच्या ‘कष्टा’ला यश आले असून विद्यमान आमदार प्रणिती शिंदेंना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.
हेही वाचा… तुतारीवाल्यांची झाली पंचाईत!
महाराष्ट्रच नव्हे तर राजस्थान, मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते निवडणूक लढण्यास उत्सुक नसल्याचे दिसले. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याचे समजते. गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत यांना पुन्हा उमेदवारी द्यावी लागली. वैभव यांच्याविरोधात ‘ईडी’ची चौकशी सुरू असून ते वादग्रस्त ठरले आहेत. २०१९ मध्ये त्यांना जोधपूरमधून उमेदवारी दिली होती, त्यांनी केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचा पराभव केला होता. यावेळी मात्र, वैभव यांचा मतदारसंघ बदलावा लागला असून त्यांना जालोरमधून उमेदवारी दिली आहे. मध्य प्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा आग्रह धरला होता पण, ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले नाहीत. कमलनाथ यांनी पुत्र नकुल नाथ यांनाच छिंदवाडा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्याचा आग्रह धरल्याचे समजते.
या पळ काढणाऱ्या नेत्यांमध्ये अपवाद ठरले ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह. ते २०१९ प्रमाणे यंदाही लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसले. यावेळी दिग्विजय सिंह आपला बालेकिल्ला, राजगढ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. गेल्या वेळी त्यांनी भाजपच्या भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. ठाकूर यांनी दिग्विजय सिंह याचा पराभव केला होता. यावेळी ठाकूर यांना मोदींनी उमेदवारी नाकारली आहे.