जळगाव : राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी न मिळाल्याने जाहीरपणे नाराजी व्यक्त करणारे राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अलिकडे पक्ष नेतृत्वाविरोधात थोडी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. मात्र, समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसींचे मेळावे घेऊन आपला प्रभाव पुन्हा एकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू झाला आहे. जळगावमधील मेळाव्यातूनही भुजबळांनी शक्तिप्रदर्शन केले. परंतु, मेळाव्यास अपेक्षेपेक्षा कमी गर्दी जमल्याने भुजबळांसमोरच पदाधिकाऱ्यांनी आगपाखड केली. मेळाव्यात भुजबळ यांनी केलेल्या मार्गदर्शनापेक्षा ही आगपाखडच अधिक चर्चेत राहिली.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे शनिवारी सायंकाळी जळगाव शहरात ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः छगन भुजबळ उपस्थित होते. विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदा आयोजित केलेल्या मेळाव्याच्या ठिकाणी वैयक्तिक भुजबळांच्या प्रभावामुळे जिल्हाभरातून मोठी गर्दी होणे अपेक्षित होते. त्यादृष्टीने उत्साहात असलेल्या आयोजकांनी आवश्यक ती जय्यत तयारी देखील करून ठेवली होती. प्रत्यक्षात मेळाव्याच्या ठिकाणी म्हणावी तशी गर्दी उशिरापर्यंत झालीच नाही. समोर अनेक खुर्च्या रिकाम्या असताना व्यासपीठ मात्र खचाखच भरलेले होते. ते पाहुन खुद्द भुजबळही संतप्त झाले.

बोलण्याची संधी मिळालेल्या समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांपैकी दशरथ महाजन यांनी नेमकी दुखरी नस ओळखली. आणि छगन भुजबळ यांच्यासमोरच मेळाव्याला गर्दी कमी झाल्याच्या मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष वेधले. प्रत्येकाने आपल्याबरोबर दोन-चार कार्यकर्ते आणले असते तर मेळाव्याला चांगली गर्दी झाली असती. संघटनेमध्ये अनेकांना फक्त पद आणि खुर्ची पाहिजे; काम करायला नको, असे कान टोचत महाजन यांनी चमकोगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर भर सभेत टिकास्त्र सोडले. विशेष म्हणजे, भुजबळांनी थांबण्यास सांगितले, तरीही ते बोलतच राहिले. त्यामुळे नंतर भुजबळांना काय बोलावे आणि काय नाही, असेच झाले.

मेळाव्यात मार्गदर्शन करताना भुजबळ यांनी, मंत्रीपद मिळाले नाही म्हणून नाराज होऊन आता ओबीसींचे मेळावे घेत आहेत, असे काहीजण बोलत असल्याचे सांगितले. मी मंत्रीपदासाठी नव्हे तर ओबीसींच्या हक्कासाठी लढा देत आहे. ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही यापूर्वीही दिल्लीत मेळावा घेतला होता. आरक्षणासाठी सरकारच्या विरोधातही लढण्याची आपली तयारी आहे. देशात वेगवेगळ्या नावाने ५४ टक्के ओबीसी समाज अस्तित्वात आहे. मात्र, आजही तो मागास जीवन जगत आहे. कोणाला काय द्यायचे, ते द्या; परंतु, आमचे आरक्षण कमी करू नका, असेही भुजबळ यांनी नमूद केले. जळगावमधील एकाही प्रभावशाली राजकीय नेत्यांसह लोकप्रतिनिधींनी मेळाव्याला हजेरी लावली नाही. त्याचीही उपस्थितांमध्ये चर्चा होती.