मोहन अटाळकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्‍ये सामील झाल्‍यानंतर प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू कडू यांनी त्‍यांचे स्‍वागत केले असले, तरी मंत्रिपदाच्‍या प्रतीक्षेत असलेल्‍या बच्‍चू कडू यांच्‍या समर्थकांमध्‍ये अस्‍वस्‍थता वाढली आहे.

विरोधात राहून काहीच फायदा नाही, विकासाचे राजकारण केले पाहिजे, हे अजित पवारांना कळले आहे, म्‍हणून एकनाथ शिंदे यांच्‍या विकासाच्‍या लाटेत अजित पवार सामील झाले आहेत, अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त करतानाच बच्‍चू कडू यांनी ‘काल खोके सरकार म्‍हणणारे आज ओके म्‍हणत सरकारमध्‍ये आले, त्‍यांचे स्‍वागत आहे’, अशी खोचक टिप्‍पणी देखील केली आहे.

हेही वाचा… ठाण्यातील शिंदे गटाला आनंद परांजपे नकोसे

राज्‍यात वर्षभरापुर्वी घडलेल्‍या सत्‍तांतराच्‍या वेळी एकनाथ शिंदे यांना साथ देण्‍यात बच्‍चू कडू हे अग्रस्‍थानी होते. प्रहार जनशक्‍ती पक्षाचे अन्‍य आमदार राजकुमार पटेल यांनीही सरकारला पाठिंबा दिला होता. बच्‍चू कडू यांना पहिल्‍या टप्‍प्‍यातच मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा त्‍यांचे समर्थक व्‍यक्‍त करीत होते, पण त्‍यांना वंचित ठेवण्‍यात आले. खुद्द बच्‍चू कडू यांनी मंत्रीपद मिळाले नसल्‍याने उघड नाराजी व्‍यक्‍त केली होती. अलीकडेच त्‍यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्‍यात आला, त्‍यांची दिव्‍यांग कल्‍याण विभागाचे अध्‍यक्ष म्‍हणून निवड करण्‍यात आली. पण, त्‍यामुळे त्‍यांचे कार्यकर्ते समाधानी नाहीत.

हेही वाचा… आधी फारसे सख्य नसलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे अजित पवारांशी सूर जुळले कसे ?

बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत गुवाहाटीला जाण्‍याचा निर्णय घेतला, तेव्‍हा अनेकांनी आश्‍चर्य व्‍यक्‍त केले होते. बच्‍चू कडू यांचा निवडणुकीच्‍या वेळी कॉंग्रेससोबत आणि भाजपसोबतही संघर्ष होत आला आहे. आता नव्‍या समीकरणांमध्‍ये त्‍यांना आपली राजकीय वाटचाल करावी लागणार आहे.

हेही वाचा… नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेनेची अधिक अडचण

बच्‍चू कडू हे महाविकास आघाडी सरकारमध्‍ये राज्‍यमंत्री होते. त्‍यांना अकोला जिल्‍ह्याचे पालकमंत्री म्‍हणून काम करण्‍याची संधी मिळाली होती. त्‍यावेळीही उपमुख्‍यमंत्री असलेल्‍या अजित पवार यांच्‍याकडे अर्थखाते होते. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी आयोजित अमरावती विभागाच्‍या वार्षिक नियोजनाच्‍या बैठकीत निधीच्‍या वाटपावरून अजित पवार आणि बच्‍चू कडू यांच्‍यात शाब्दिक खडाजंगी पहायला मिळाली होती. अकोला जिल्‍ह्यासाठी मिळालेल्‍या निधीवर बच्‍चू कडू समाधानी नव्‍हते, परिणामी बच्‍चू कडू यांनी आक्रमक होत नाराजी व्‍यक्‍त केली होती.

हेही वाचा… धर्मरावबाबांच्या मंत्रीपदामुळे भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता !

अमरावती जिल्‍ह्यात शिंदे-फडणवीस सरकारच्‍या समर्थनार्थ आमदार बच्‍चू कडू, आमदार रवी राणा हे पुढे आले होते, आता राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्‍यक्ष संजय खोडके यांनी देखील अजित पवार यांच्‍या सोबत राहण्‍याचा निर्णय घेतल्‍याने सत्‍तारूढ गट अधिक मजबूत झाल्‍याचे मानले जात आहे. दुसरीकडे, संजय खोडके यांच्‍या पत्‍नी आणि कॉंग्रेसच्‍या आमदार सुलभा खोडके यांनी आपण कॉंग्रेस पक्षातच आहोत आणि कॉंग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, माजी विधानसभा उपाध्‍यक्ष शरद तसरे या ज्‍येष्‍ठ नेत्‍यांनी शरद पवार यांच्‍यासोबत राहण्‍याचा निर्णय घेतला आहे. अनेक नेत्‍यांची संभ्रमावस्‍था आहे.

निवडणुकीला वर्षभराचा अवकाश असताना राजकीय समीकरणे काय राहतील, याचे आडाखे बांधले जात आहेत. अमरावतीत राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचा एकही आमदार नाही. महापालिका, जिल्‍हा परिषदेतही फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. मध्‍यंतरीच्‍या काळात संजय खोडके यांना पक्षातून काढून टाकण्‍यात आल्‍यानंतर पक्षाचे स्‍थानिक पातळीवर झालेले नुकसान अजूनपर्यंत भरून निघालेले नाही, अशा स्थितीत खोडके यांनी भूमिका महत्‍वाची ठरणार आहे. जिल्‍ह्यातील राजकारणात आगामी काळात कमालीचा अंतर्विरोध आणि पेच-डावपेच बघायला मिळतील, असे चित्र आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to new political development supporters of mla bacchu kadu restless print politics news asj