अहिल्यानगर : सहा महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार नीलेश लंके यांना पारनेर विधानसभा मतदारसंघातून ३८ हजारांवर मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर याच मतदारसंघात त्यांच्या पत्नी राणी लंके यांना दीड हजारांच्या निसटत्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला. सहा महिन्यातच घडलेला हा बदल आहे. याला केवळ ‘लाडकी बहीण’ योजनाच कारणीभूत ठरली आहे, असे नाही तर इतरही अनेक कारणे जबाबदार आहेत आणि ही कारणे केवळ मतदारसंघापुरती मर्यादित नाहीत.
पारनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) काशिनाथ दाते निसटत्या मतांनी विजयी झाले. खरेतर पारनेरमधील आमदारकीचा राजीनामा देऊन नीलेश लंके यांनी लोकसभा सदस्य म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्याचवेळी राणी लंके पारनेरमध्ये विधानसभेच्या उमेदवार असतील हे निश्चित झाले होते. त्या तुलनेत काशिनाथ दाते यांची उमेदवारी खुपच उशिरा म्हणजे, निवडणूक जाहीर झाल्यानंतर, ऐनवेळीअजित पवारांकडून उमेदवारी घोषीत करण्यात आली. म्हणजे लंके दांपत्याला प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळालेला होता. तरीही राणी लंके यांचा पराभव झाला.
आणखी वाचा-यवतमाळात कुणबी, मराठा समाजाचे अस्तित्व पणाला, विधानसभा निवडणुकीत धृवीकरणाचे प्रयत्न फसले
नीलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांच्या अनेक सहकार्यांना उमेदवारीचे धुमारे फुटले होते. परंतु लंके यांनी आपल्या घरातच उमेदवारी ठेवणे पसंत केले, ते अनेकांना रुचले नाही. पारनेरमध्ये विखे समर्थकांची संख्या मोठी आहे. लोकसभेतील पराभवानंतर राधाकृष्ण विखे व डॉ. सुजय विखे यांनी लंके विरोधकांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. तो प्रयत्न यशस्वी झाला. पारनेरला अहिल्यानगर तालुक्यातील दोन गट जोडलेले आहेत. या भागातील माधवराव लामखडे यांची बंडखोरी लंके यांनी रोखली तरी ‘मविआ’मधील ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांची उमेदवारी रोखण्यात लंके अयशस्वी ठरले. कार्ले यांच्या उमेदवारीमागे विखे यांचा हात असल्याची उघड चर्चा होत होती. कार्ले यांनी १० हजार ८०३ मते मिळवली.
मतदारसंघ आपलाच आहे, या आत्मविश्वासाने खासदार नीलेश लंके पारनेरकडे दुर्लक्ष करून जिल्हाभर प्रचारासाठी फिरत राहीले. अगदी राधाकृष्ण विखे यांच्याविरोधातील प्रचारासाठी त्यांनी शिर्डी दौरे केले. हा अतिआत्मविश्वास त्यांना आडवा आला. त्यांची प्रचार यंत्रणाही याच अतिआत्मविश्वासातून ढिली पडली. ज्या तडफेने नीलेश लंके व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुजय विखे यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली तो जोश पारनेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत हरवला होता.
पारनेरच्या जागेची मागणी ठाकरे गटानेही लावून धरली गेली होती. ‘मविआ’मध्ये जिल्ह्यात श्रीगोंदा-अहिल्यानगर-पारनेर अशा तीन जागांचा तिढा होता. श्रीगोंद्याऐवजी ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्ते अहिल्यानगर व पारनेरच्या जागेसाठी अधिक आग्रही होते. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी लंके यांच्या विजयासाठी जीवाचे रान केले. त्याचवेळी लंके यांनी पारनेर मतदारसंघ ठाकरे गटाला सोडण्याचा शब्द दिला होता, तो त्यांनी पाळला नाही, असा दावा केला जातो. त्यातूनच ठाकरे गटाकडून बंडखोरी केली गेली. श्रीगोंद्याची उमेदवारी पक्षात ऐनवेळी आलेल्या अनुराधा नागवडे यांना दिली गेली, यामध्ये काहीतरी ‘काळंबेरं’ घडल्याचा जाहीर आरोपच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला होता. यामध्ये नीलेश लंके यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचा संशय ठाकरे गटाचे कार्यकर्ते घेतात. त्यातून पारनेर व अहिल्यानगरमधील कार्यकर्त्यात लंके यांच्याविषयी नाराजीची भावना तयार झाली.
लंके यांचे ऐकेकाळचे सहकारी माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी बंडखोरी केली. त्यांच्याविषयी लंके गाफील राहीले. अजित पवार व विखे यांच्या पुढाकारातून औटी यांनी ऐन मतदानाच्या तोंडावर काशिनाथ दाते यांना पाठिंबा जाहीर केला. त्याचाही परिणाम जाणवला.