संतोष प्रधान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : राहुल गांधी यांच्या १४ दिवसांच्या राज्यातील ‘भारत जोडो’ यात्रेला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे प्रदेश काँग्रेसमधील मरगळ दूर झाली आहे. या यात्रेच्या निमित्ताने सारे गटतटाचे नेते एकत्र आल्याचे चित्र बघायला मिळले. लोकसभा वा विधानसभा निवडणुका अद्याप दूर असल्या तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तरी किमान यात्रा मार्गात तरी चांगले यश मिळविण्याचे काँग्रेसपुढे आव्हान असेल.

राज्यातील राहुल गांधी यांच्या यात्रेला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांमधून यात्रेचा प्रवास झाला. राज्यातील ३८२ किमी. अंतराच्या यात्रेत राहुल गांधी यांनी विविध समाज घटकांशी संवाद साधला. नांदेड आणि शेगाव अशा दोन ठिकाणी जाहीर सभा झाल्या. यापैकी नांदेडमधील सभा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यशस्वी केली होती. शेगावच्या सभेला चांगली गर्दी झाली होती. विदर्भात काँग्रेसचा अद्यापही चांगला जोर असल्याचे चित्र बघायला मिळाले.

हेही वाचा… राजाराम हायस्कूल स्थलांतरावरून कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात काहूर

राज्यात २०१४ मध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. २०१९ मध्ये तर राज्यात काँग्रेस चौथ्या क्रमाकांवर मागे फेकला गेला. तेव्हापासून पक्षात एक प्रकारची मरगळ आली होती. अनेक प्रमुख कार्यकर्ते भाजपवासी झाले. काही नेतेमंडळी पक्षात फारशी सक्रिय राहिली नाहीत. पक्ष चालविण्याकरिता आर्थिक बळ महत्त्वाचे असते. नेमका पक्ष त्यात मागे पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पुढे गेला हे तर काँग्रेस नेत्यांना फारच झोंबले. नेतृत्वाअभावी पक्ष विस्कळीत झाला. महाविकास आघाडीत सहभागी होऊनही काँग्रेसला प्रभाव पाडता आला नाही. राष्ट्रवादीने सत्तेचा पुरेपूर फायदा उठवीत पक्ष वाढविण्यासाठी त्याचा उपयोग केला. याउलट काँग्रेसच्या मंत्र्यांना तेवढी छाप पाडता आली नाही वा सत्तेचा काँग्रेसला तेवढा राजकीय फायदा झाला नव्हता.

हेही वाचा… औरंगाबादमध्ये पालकमंत्री संदीपान भुमरे शिवसेनेचे लक्ष्य

राहुल गांधी यांच्या पदयात्रेमुळे मरगळ आलेल्या काँग्रेसला काही प्रमाणात चैतन्य प्राप्त झाले. मराठवाडा आणि विदर्भातील पाच जिल्ह्यांपुरतीच यात्रा मर्यादित असली तरी राज्यभर वातावरणनिर्मिती करण्यात पक्ष यशस्वी झाला. पदयात्रेच्या मार्गात लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राज्यात अपेक्षेपेक्षा अधिक चांगला सामान्यांचा प्रतिसाद मिळाल्याचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व यात्रेचे राज्यातील समन्वयक बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. राहुल गांधी यांची यात्रा पाच जिल्ह्यांपुरतीच सीमीत होती. यापैकी अशोक चव्हाण यांच्यामुळे नांदेडमध्ये काँग्रेसचे चांगले प्राबल्य आहे. राजीव सातव यांच्या पश्चात हिंगोलीत काँग्रेसची पूर्वीएवढी ताकद राहिलेली नाही. अकोल्यात पक्षाचे अस्तित्व मर्यादितच आहे. वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांतही काँग्रेस तेवढा ताकदवान नाही. यामुळेच आगामी नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये यात्रेचा प्रवास झालेल्या पाच जिल्ह्यांमध्ये तरी पक्षाची ताकद वाढविण्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अन्य पदाधिकाऱ्यापुढे आव्हान असेल.

हेही वाचा… काँग्रेसच्या पारंपारिक आदिवासी मतदारांना राहुल गांधी यांची साद

वादाची किनार

राहुल गांधी यांनी यात्रेच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप व रा. स्व. संघाला लक्ष्य केले होते. राज्यातील भाजप नेत्यांना राहुल गांधी यांच्या वर टीका करण्यास किंवा काही खुसपट काढण्याची आधी संधी मिळाली नव्हती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाची तीव्र प्रतिक्रिया उमटली. राहुल गांधी यांच्या टीकेमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राहुल यांच्या मताशी सहमत नसल्याचे जाहीर केले. भाजपने घेरल्याने महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थित केला. पण काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व खासदार जयराम रमेश यांनी सावरकरांवरून महाविकास आघाडीत फूट पडणार नाही, असे स्पष्ट केले. राहुल यांनी बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या समारंभात तसेच पत्रकार परिषदेत सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. पण वाद जास्त वाढू लागल्यावर शेगावची सभा किंवा नंतर याबद्दल मतप्रदर्शन करण्याचे टाळले.

हेही वाचा… मंत्रिपदाची चर्चा अन् समर्थक आमदारांच्या मतदारसंघावर मुख्यमंत्री शिंदे यांची मेहरनजर

महाविकास आघाडीची साथ

राहुल गांधी यांच्या यात्रेत शिवसेनेचे आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आदी सहभागी झाले होते. महाविकास आघाडी एकसंघ आहे हा संदेश त्यातून गेला. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे यात्रेत सहभागी होणार होते, पण प्रकृती बिघडल्याने त्यांना प्रवास करणे शक्य झाले नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to rahul gandhis bharat jodo yatra congress in maharashtra gets new life now the challenge is to achieve success print politics news asj