पिंपरी : एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे यांनी गेल्या काही दिवसांत घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांच्याबाबत पक्षात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाच्या आंदोलनाकडे पाठ फिरविणे, चिंचवडच्या पोटनिवडणुकीदरम्यानची संशयास्पद भूमिका यामुळे आमदार बनसोडे यांचे नेमके चाललेय काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
शहरात विधानसभेचे पिंपरी, चिंचवड, भोसरी असे तीन मतदारसंघ आहेत. त्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. सन २००९ च्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अण्णा बनसोडे विधानसभेत गेले. त्यांनी भाजपच्या अमर साबळे यांचा पराभव केला. २०१४ मध्ये सर्वच पक्ष स्वतंत्र लढले. त्यात शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांनी बनसोडे यांचा पराभव केला. सन २०१९ ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढायची, की दुसऱ्या पक्षात जायचे या द्विधा मन:स्थितीत बनसोडे असतानाच पक्षाने त्यांच्याऐवजी संत तुकारामनगरच्या तत्कालीन नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे बनसोडे यांची भंबेरी उडाली. जुन्या लोकांना एकत्र करून अजित पवार यांच्याकडे धाव घेतली. पवार यांनी शिलवंत यांची जाहीर केलेली उमेदवारी रद्द करून बनसोडे यांना उमेदवारी दिली आणि बनसोडे दुसऱ्यांदा ‘घड्याळा’वर विधानसभेत पोहोचले. त्यांना भाजपच्या तत्कालीन नगरसेवकांनी मदत केल्याचे आजही उघडपणे बोलले जात आहे.
आमदार म्हणून निवडून आल्यापासून बनसोडे हे पक्षापासून फटकून राहत असल्याचे वारंवार दिसून येते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना बनसोडे पक्षाच्या नेत्यांसोबत अधून-मधून दिसत होते. मात्र, राज्यातील सरकार गेल्यानंतर शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असताना बनसोडे पक्षासोबत कधीच दिसत नाहीत. शहर संघटनेकडून विविध प्रश्नांवर सातत्याने आंदोलने केली जात आहेत. शहरातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असलेले बनसोडे मात्र एकाही आंदोलनाला फिरकल्याचे दिसले नाही.
पिंपरी विधानसभेच्या निवडणुकीत निर्णायक ठरणारी मते असलेल्या ‘कॅम्पा’तील पक्षातील माजी नगरसेवकही त्यांच्यापासून दूर गेल्याचे दिसले. माजी उपमहापौराच्या वाढदिवसाच्या जाहिरात फलकांवर राष्ट्रवादीचे केंद्र, राज्य स्तरावरील नेत्यांसह स्थानिक नेत्यांच्या छबी झळकत होत्या. मात्र, आमदार बनसोडे यांचे छायाचित्र नव्हते. त्यामुळे माजी नगरसेवकांनाही आमदार बनसोडे नकोसे झाले आहेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, याबाबत आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
कधी भाजपला पूरक भूमिका, तर कधी एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रवास
आमदार अण्णा बनसोडे हे कधी भाजपला पूरक भूमिका घेताना दिसतात, तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्रित प्रवास करतात. त्यावरून आणखी संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.