तुकाराम झाडे
हिंगोली : लोकसभेच्या निवडणुकीत जातीच्या टोकदार भूमिकांच्या आधारे मतदान करण्याचा इतिहास असणाऱ्या हिंगोलीतून यावेळी वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागले आहे. या चर्चेला आदिवासी आणि ओबीसी मतदारांची सांगड घालून नवी गणिते मांडली जात आहे. हिंगोली मतदारसंघातून यापूर्वी बंजारा समाजातील उत्तमराव राठोड, कोमटी समाजाचे विलास गुंडेवार आणि माळी समाजाचे राजीव सातव यांना यश मिळाले होते, असे आवर्जून सांगितले जात आहे. या मतदारसंघात मराठा मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. ‘भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढविण्यास सकारात्मक असल्याचा संदेश मोपलवार यांनी दिला आहे.’
१९८९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उत्तमराव राठोड यांना दोन लाख ७१ हजार ६४० मते मिळाली. तर भाजपच्या विलास गुंडेवार यांना दोन लाख ४२५ एवढे मतदान झाले. यावेळी निवडणूक रिंगणात सहा उमेदवार होते. १९९१ मध्येही उत्तमराव राठोड विरुद्ध विलास गुंडेवार अशीच निवडणूक झाली. मात्र तेव्हा विलास गुंडेवार हे शिवसेनेचे उमेदवार होते. जनता दलाचे डी. बी. पाटील यांना एक लाख ३८ हजार मते मिळाली होती. विलास गुंडेवार विजयी झाले. १९९६ मध्ये विलास गुंडेवार यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळविली. तेव्हा त्यांना शिवसेनेच्या शिवाजी माने यांनी पराभूत केले. निवडणुकीमध्ये हिंगोली जिल्ह्याचा मतदार जातीय प्रारूप स्वीकारतो, असे वारंवार दिसून आले आहे. जरांगे पाटील यांच्या सभेनंतर मराठा समाज एकवटलेला आहे. त्याचे परिणाम ओबीसी समाजातही दिसू लागले आहे. उत्तमराव राठोड यांनी हिंगोलीतून पाच वेळा निवडणूक लढविली आणि तीन वेळा ते विजयी झाले. त्यांनी बापूसाहेब काळदाते, शंकरराव खराटे आणि विलास गुंडेवार यांचा पराभव केला. उत्तमराव राठोड अपक्ष उभे राहिले आणि त्यांचा पुढे पराभव झाला. विलास गुंडेवार यांनी तीन वेळा निवडणूक लढविली. पहिल्यांदा ते भाजपकडून उमेदवार हाेते. तेव्हा त्यांचा कॉग्रेसच्या उत्तमराव राठोड यांनी पराभव केला. दुसऱ्यांदा त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली. तेव्हा त्यांनी उत्तमराव राठोड यांचा पराभव केला. तिसऱ्यांनी ते कॉग्रेसकडून उभे होते. तेव्हा त्यांचा शिवसेनेच्या शिवाजी माने यांनी पराभव केला.
हेही वाचा… अकोल्यात पोटनिवडणूक होणार ? प्रशासनाकडून तयारी
हेही वाचा… पालघर लोकसभा मतदारसंघावर भाजपा दावा कायम
२०१४ मध्ये ही लोकसभा निवडणूक आपल्या मर्जीतल्या कार्यकर्त्याला लढविता यावी म्हणून राहुल गांधी यांनी मध्यस्थी करत राजीव सातव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. मोदी लाटेत महाराष्ट्रातून आलेल्या काँग्रेसच्या दोन जागांपैकी एक जागा हिंगोली मतदारसंघाची होती तेव्हा राजीव सातव यांनी सुभाष वानखेडे यांचा पराभव केला. २०१४ च्या निवडणुकीत २३ उमेदवार रिंगणात होते. सातव यांना चार लाख ६७ हजार ३९७ मते मिळाली आणि सुभाष वानखेडे यांना चार लाख ६५ हजार ७६५ एवढी मते मिळाली. उमेदवारांची जात कोणती यावरून हिंगोली लोकसभेत मतदान बदलते, असा इतिहास असल्याने मोपलवार यांच्या उमेदवारीची बांधणी याच जातीय प्रारुपावर होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. नव्याने होणाऱ्या आरक्षण मागणीच्या सभा आणि त्याला होणारा विरोध यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत जातीय रंगही ठसठशीतपणे दिसेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.