अलिबाग – राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट फुटून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युती सरकारमध्ये सहभागी झाला. या बदललेल्या राजकीय समिकरणांमुळे रायगड जिल्ह्यात विधानसभेचे सर्वच आमदार सत्ताधारी गटात दाखल झाले आहेत. विरोधी पक्षाचा एकही आमदार जिल्ह्यात उरलेला नाही.
जिल्ह्यात विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत. अलिबाग, पेण, उरण, पनवेल, कर्जत-खालापूर, महाड आणि श्रीवर्धन मतदारसंघांचा समावेश आहे. अलिबाग, कर्जत-खालापूर आणि महाड मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे आहेत. तर पेण, पनवेल आणि उरण येथे भाजपचे आमदार आहेत. श्रीवर्धनमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे निवडून आल्या आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपचे तीन आमदार विरोधी पक्षात होते. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपची सत्ता राज्यात स्थापन झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी तीन आमदार सत्ताधारी बनले होते. आदिती तटकरे या विरोधी पक्षाच्या आमदार झाल्या होत्या. मात्र अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट राज्यसरकारमध्ये सहभागी झाला. आदिती तटकरे यांची महिला व बालकल्याण मंत्रीपदावर वर्णी लागली. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समिकरणे पुन्हा बदलली आहे. जिल्ह्यात विरोधी पक्षांना विधानसभेत स्थानच राहिले नसल्याचे चित्र तयार झाले आहे. जिल्ह्यातील सातही विधानसभेचे आमदार सत्ताधारी बनले आहेत.
राज्यसरकारमध्ये राष्ट्रवादीच्या समावेशामुळे शिवसेना आणि भाजपच्या गटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी याबाबत जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. आदिती तटकरे पालकमंत्री नको असा इशाराही दिला होता. पण नंतर त्यांनी आपली विरोधाची तलवार तुर्तास म्यान केल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांनी गोगावले यांची नाराजी दूर करण्यासाठी पुरवणी मागण्यामध्ये सर्वाधिक झुकते माप गोगावले यांना दिल्याचे बोलले जात आहे. इतर आमदारांनाही सत्तेची फळे चाखायला मिळत असल्याने सर्वचजण तुपाशी, अन कोणी नाही उपाशी अशी गत झाली आहे.
हेही वाचा – पश्चिम बंगाल, राजस्थान ते दिल्ली! मणिपूरच्या घटनेवरून सत्ताधारी-विरोधकांत घमासान!
रायगड जिल्ह्यात विधानपरिषदेचे दोन आमदार आहेत. यात शेकापचे जयंत पाटील आणि राष्ट्रादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांचा समावेश आहे. विधान परिषदेचे जयंत पाटील यांचा अपवाद सोडला तर अनिकेत तटकरे हेदेखील सत्ताधारी गटात सहभागी झाले आहेत.
दोन्ही खासदारही सत्ताधारी गटात
रायगड जिल्ह्यात रायगड आणि मावळ या दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश होते. मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे लोकसभेत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तर रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे खासदार आहेत. आधी श्रीरंग बारणे हे शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाले तर आता सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे दोन्ही खासदारही सत्ताधारी गटात दाखल झाले आहेत.