सिद्धेश्वर डुकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांना राज्यातील युवकांचा प्रतिसाद किती आणि कसा मिळतोय याची चुणूक कराडमध्ये अजित पवार गटाला पहायला मिळाली आहे. ही बाब विचारात घेऊन राज्यातील युवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने (अजित पवार गट) दौरे काढायला सुरुवात केली आहे.

पक्षात अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी गेले होते. पुण्यातून निघाल्यापासून ते कराडला पोहचेपर्यंत वाटेत ठिकठिकाणी पवारांना युवकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. शिवाय येवला येथील सभेला जाताना मुंबईतून नाशिक दरम्यान रस्त्यात युवकांनी पवारांना भेटण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी केली होती. याची नोंद घेऊन अजित पवार गटाने युवक दौऱ्यांचे आयोजन केले आहे.

आणखी वाचा-महायुती आणि इंडियामध्ये राज्यात जागावाटपाचे त्रांगडे

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघटनात्मक पातळीवर युवकांना खेचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना राज्यभर दौरे काढण्याचा आदेश दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचा पक्षबांधणी दौरा सुरु आहे. सोलापूर, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील युवक पदाधिकाऱ्यांशी पक्षबांधणी संदर्भात ते चर्चा करणार आहेत. यापूर्वी बीड, औरंगाबाद या जिल्ह्यांचा दौरा चव्हाण यांनी केला आहे. ७ ऑगस्टला नाशिक येथे युवा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

आणखी वाचा-पावसाळी अधिवेशनावर फडणवीस यांचीच छाप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त पदाधिकारी,कार्यकर्ते यांना अजित पवार गटासोबत जोडणे. हा या दौऱ्यामागील प्रमूख हेतू असला तरी इतर पक्षातील युवा कार्यकत्यांना देखील पक्षासोबत आणण्याचा प्रयत्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला तरूणांची संघटनात्मक पातळीवर गरज भासते. ही गरज भागवण्यासाठी या दौऱ्यांचे नियोजन केले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to the charisma of sharad pawar in youth ajit pawar group is planning youth tours across the state print politics news mrj
Show comments