Rahul Gandhi meet congress worker in Ranthambore visit: काँग्रेसचे नेते राहुल गांधी राजस्थानमधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात दोन दिवसांची भटकंती करायला नुकतेच गेले होते. या दौऱ्यात त्यांची भेट काँग्रेस कार्यकर्ता छुट्टन लाल मीणा यांच्याशी झाली. कार्यकर्त्याशी संवाद साधत असताना राहुल गांधी यांनी सहज प्रश्न विचारला की, राज्याला कशाप्रकारचे नेतृत्व दिले पाहिजे. यावेळी छुट्टन लाल मीणा यांनी वेळ न दवडता सचिन पायलट यांचे नाव घेतले. राजस्थानमध्ये काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी टोंकचे आमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्या हाती पक्षाची कमान द्यावी, अशी मागणी छुट्टन लाल मीणा यांनी केली.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबरोबर झालेल्या भेटीदरम्यान काय काय संवाद झाला याची माहिती मीणा यांनी माध्यमांना दिली. “राजस्थानमध्ये कशाप्रकारचे नेतृत्व द्यायला हवे, असा प्रश्न राहुल गांधींनी मला विचारला. मी लगेच सांगितले की, तरुण तडफदार सचिन पायलटसारखा नेता हवा, जो ३६ समाजाचे नेतृत्व करू शकतो”, अशी प्रतिक्रिया शेरपूर खिलचीपूरचे विभाग अध्यक्ष असलेल्या छुट्टन लाल मीणा यांनी दिली. माझ्या उत्तरानंतर राहुल गांधी यांनी फक्त स्मित हास्य केले, असेही मीणा यांनी सांगितले.

द इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधत असताना मीणा म्हणाले, “सचिन पायलट यांच्या हातात काँग्रेस पक्षाची सूत्र देत नाहीत, तोपर्यंत राजस्थानमध्ये काँग्रेसचे पुनरुज्जीवन शक्य नाही. अशोक गेहलोत चांगले आहेत, पण त्यांनी दोन वेळा मुख्यमंत्रिपद भूषविलेले आहे. त्यांनी पक्ष संघटनेकडे तितके लक्ष दिले नाही. त्यांच्या काळात फक्त आमदारांचीच भरभराट झाली, त्यामुळे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, पक्षाला यामुळे नुकसान झाले.”

राहुल गांधी रणथंबोरचा दौरा करण्याआधी गुजरातमध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीची (AICC) बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी यांनी पक्षसंघटनेवर अधिक भर दिला होता. मीणा पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी जिल्हाध्यक्षांना ताकद देण्यासंदर्भात भूमिका मांडल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त केले. पक्षातील सामान्य कार्यकर्त्याला महत्त्व दिल्यामुळे त्याचा निश्चितच लाभ पक्षाला होईल.

गुजरातमधील दोन दिवसांची बैठक संपन्न झाल्यानंतर राहुल गांधींनी सवाई माधवपूर जिल्ह्यातील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाला ११ ते १३ एप्रिलदरम्यान भेट दिली. हा त्यांचा खासगी दौरा होता. छुट्टन लाल मीणा दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी असे दोन वेळा त्यांना भेटले. सचिन पायलट यांचा पूर्व राजस्थानसह सवाई माधवपूर जिल्ह्यावर मोठा प्रभाव आहे.

काँग्रेसची सत्ता असताना सवाई माधवपूरमधील आमदार दानिश अबरार हे पायलट गटातील विश्वासू समजले जात होते. मात्र, २०२० साली अशोक गहलोत यांच्याविरुद्ध बंड करत असताना त्यांनी गट बदलला होता. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत अबरार यांचा भाजपाच्या किरोडी लाल मीणा यांनी पराभव केला. यानंतर जुलै २०२४ मध्ये अबरार यांनी आपण २०२० साली चूक केल्याचे जाहीरपणे कबूल केले आणि एक विशाल रॅली कडून सचिन पायलट जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या.