राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा यांच्यात थेट लढत होत आहे. आपली सत्ता कायम राखण्यासाठी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे. तर, अशोक गहलोत यांची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, राजस्थानच्या याच निवडणुकीत जननायक जनता पार्टी (जेजेपी) या पक्षानेही उडी घेतली आहे. हा पक्ष राजस्थानमध्ये २५ ते ३० जागा लढवणार आहे. त्यासाठी जेजेपी पक्षाचे सर्वेसर्वा दुष्यंत चौटाला राजस्थानमध्ये प्रचार करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेजेपी पक्ष २५ ते ३० जागा लढवणार

जेजेपी पक्षाकडून दुष्यंत चौटाला शेतकरी नेते असल्याची प्रतिमा रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा पक्ष २०० पैकी २५ ते ३० जागा लढवणार आहे. अद्याप या पक्षाने आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. मात्र चौटाला यांनी १९ आणि २० ऑक्टोबर रोजी कोटपुतली, जयपूर आणि भरतपूर मतदारसंघातील ५० हून अधिक गावांमध्ये रोड शो केले. जेजेपी पक्षाकडून ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा – कर्नाटक काँग्रेसमध्ये घराणेशाही; मुलांना लोकसभेचे तिकीट मिळण्यासाठी दोन मंत्र्यांमध्ये संघर्ष

जेजेपी पक्षाने सात जिल्ह्यांवर लक्ष केले केंद्रित

राजस्थानमध्ये साधारण ७५ टक्के लोक हे ग्रामीण भागात राहतात. याच मतदारांवर जेजेपी पक्षाकडून प्रयत्न केला जात आहे. हा पक्ष मुख्यत्वे हनुमानगड, झुंझुनू, छुरू, सिकर, जयपूर, अलवर आणि भरतपूर या हरियाणा राज्याला लागून असलेल्या सात जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करत आहे. या सात जिल्ह्यांत विधानसभेचे एकूण ६२ मतदारसंघ आहेत. २०१८ सालाच्या निवडणुकीत काँग्रेसने २८, तर भाजपाने २१ जागा जिंकल्या होत्या.

आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार

जेजेपीने अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. आपल्या उमेदवारांबद्दल दुष्यंत चौटाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जेजेपी पक्ष हा राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक पहिल्यांदाच लढत आहे. या पहिल्याच निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत. साधारण २५-३० जागांवर आम्ही निवडणूक लढवणार आहोत,” असे चौटाला म्हणाले.

हेही वाचा – राजकीय स्वार्थासाठी देशात अनिष्ठ शक्तींसोबत आघाडी, सरसंघचालकांची विरोधी पक्षांच्या आघाडीवर टीका

हरियाणात राबवलेल्या योजनांचा राजस्थानमध्ये उल्लेख

राजस्थानच्या प्रचारामध्ये जेजेपी हा पक्ष गरीब, शेतकरी, कामगारवर्गाचा पक्ष असल्याची प्रतिमा निर्माण केली जात आहे. या पक्षाकडून हरियाणामध्ये लागू केलेल्या योजना आणि घेतलेले निर्णय हे राजस्थानच्या जनतेला सांगितले जात आहेत. हरियाणामध्ये पंचायती राजच्या निवडणुकीत महिलांना आरक्षण, खासगी क्षेत्रात नोकऱ्यांत आरक्षण, किमान आधारभूत किमतीवर पिकांची खरेदी, नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवणे आदी निर्णय सत्तेत सहभागी असलेल्या या पक्षाने घेतलेले आहेत. जेजेपी पक्षाकडून याच निर्णयांचा उल्लेख राजस्थानमध्ये प्रचार करताना केला जात आहे.

धोरण ठरवताना कामगार, गरीब शेतकऱ्यांना विचारात घेतले जाईल

राजस्थानमध्ये आपल्या सभेमध्ये दुष्यंत चौटाला जनतेला अनेक आश्वासने देत आहेत. यामध्ये किमान आधारभूत किमतीवर बाजरी विकत घेऊ, शेतकऱ्यांना मिळणारी मदत थेट बँक खात्यात जमा केली जाईल, अशी आश्वासने दिली जात आहेत. राजस्थानमध्ये धोरण ठरवताना कामगार, गरीब आणि शेतकऱ्यांना विचारात घेतले जाईल, असेही चौटाला राजस्थानच्या जनतेला सांगत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dushyant chautala jjp party will contest 25 to 30 seats in rajasthan assembly election 2023 prd