चंद्रपूर : ब्रम्हपुरी मतदारसंघात विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासमोर भाजपने कृष्णलाल सहारे हा कुणबी समाजातील उमेदवार दिला. येथे काँग्रेस व भाजपमध्ये थेट लढत आहे. ही थेट लढत काँग्रेससाठी फायद्याची ठरण्याची दाट शक्यता असल्याने वडेट्टीवार यांचा सलग तिसरा विजय सोपी दिसतो आहे. दुसरीकडे, वडेट्टीवार यांना ब्रम्हपुरी मतदारसंघात बांधून ठेवण्यात भाजपला अपयश आल्याने लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील मतदारसंघांवरही त्याचा परिणाम होण्याची चिन्हे आहे.
ब्रम्हपुरी हा जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघ आहे जिथे आजवर काँग्रेस, शिवसेना, जनता दल, भाजप या पक्षांचे आमदार निवडून आले आहेत. २०१४ पासून येथे वडेट्टीवार निवडून येत आहेत. २०१९ ची निवडणूक वडेट्टीवार यांनी १७ हजारांपेक्षा अधिकच्या मताधिक्क्यांनी सहज जिंकली. मतदारसंघावर मजबूत पकड असलेल्या वडेट्टीवार यांना घेरण्यासाठी भाजपने येथे कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कृष्णा सहारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यांच्यासोबत एकूण १३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसचे मतविभाजन करणारा उमेदवार नसल्याने येथे काँग्रेस व भाजपची थेट लढत आहे. ही थेट लढत काँग्रेससाठी नेहमीच फायद्याची ठरत असल्याने वडेट्टीवार यांनी यंदाची निवडणूक सहज घेतली आहे.
आणखी वाचा-मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
या मतदारसंघात कुणबी मतदार मोठ्या संख्येने असल्याचे सांगितले जात असले तरी येथे दलित व अन्य समाजही मोठा आहे. वडेट्टीवार यांना ब्रम्हपुरीत बांधून ठेवण्यात भाजपला अपयश आले आहे. त्याचा परिणाम इतर मतदारसंघांवर होण्याची शक्यता आहे. ब्रम्हपुरी मतदारसंघाला लागून गडचिरोली, आरमोरी, चिमूर, बल्लारपूर हे चार मतदारसंघ आहेत. वडेट्टीवार यांनी या चारही मतदारसंघात जाहीर सभेच्या माध्यमातून प्रचाराचा व बैठकांचा धडाका सुरू केला आहे. ब्रम्हपुरी मतदारसंघात वडेट्टीवार कुटुंब सक्रियपणे प्रचारात उतरले आहे. त्यांची कन्या प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार हा मतदारसंघ सांभाळत आहेत. वडेट्टीवार यांचा प्रचार रंगला असताना भाजप मात्र प्रचारात कमी पडत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
आणखी वाचा-महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
येथे बहुजन समाज पक्षाचे केवलराम पारधी, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. राहुल मेश्राम व रिपाईचे रमेश समर्थ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र यांचा प्रभाव प्रचारात कमी आहे. एकूणच, प्रतिस्पर्धी उमेदवार राजकीयदृष्ट्या कमकुवत दिसत असल्याने वडेट्टीवार यांच्यासाठी यंदाची निवडणूक सोपी असेल, असेच चित्र आहे.