७ सप्टेंबरपासून तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरु झालेल्या ‘भारत जोडो यात्रे’ला बुधवारी १०० दिवस पूर्ण झाले. ही यात्रा सध्या राजस्थानातील सवाई माधोपूरजवळील भाडोटी येथे आहे. त्यात बुधवारी या यात्रेत भारतीय रिझर्व्ह बॅकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी झाले होते.

माधोपूरजवळील भाडोटी येथून बुधवारी सकाळी रघुराम राजन या यात्रेत सहभागी होऊन राहुल गांधी यांच्यासमवेत काही वेळ चालले. काँग्रेसने राहुल गांधींबरोबरचे राजन यांचे छायाचित्र ट्वीट केलं. “द्वेषाविरोधात देश एकजूट होत असून, या यात्रेत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आम्हाला यात नक्कीच यश येणार आहे,” असं त्यावर लिहण्यात आलं.

तर, काँग्रेसकडून एक व्हिडीओ युट्यूबवर टाकण्यात आला आहे. त्यामध्ये राहुल गांधी आणि रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्था, उत्पन्न असमानता, बेरोजगारी, लहान व्यावसायिकांना भेडसवणाऱ्या समस्या, आयात-निर्यात धोरण यावर चर्चा केली. यावेळी रघुराम राजन म्हणाले, “लोकशाही ही भारताची ताकद आहे. अनेक देश भारताच्या निर्णयाकडे पाहत असतात. त्यामुळे आपण काय करत आहोत आणि कोणत्या मार्गाने जातो, याचा विचार करण्याची गरज आहे.”

हेही वाचा : मोदींचे विश्वासू सी. आर. पाटील नेमके आहेत कोण ?

आर्थिकदृष्ट्या पुढील वर्ष कठीण जाणार असल्याचा इशारा रघुराम राजन यांनी दिला. “जग मंदीच्या सावटाखाली येण्याची शक्यता आहे. कारण, व्याजदर वाढत असल्याने विकास मंदावणार आहे. त्याचा फटका भारतालाही बसू शकतो. भारतातही व्याजदर वाढल्याने निर्यात मंदावली आहे. त्यामुळे भारतात महागाई वाढू शकते.”

भारताच्या विकासदरावर बोलताना राजन यांनी सांगितलं, “करोना महामारी ही समस्या होती. पण, त्यापूर्वीच भारताचा विकासदर ९ वरून ५ टक्क्यांवर गेला होता. भारताने सुधारणा घडवून आणल्या नाहीत. नोकऱ्या जाणे, वाढती बेरोजगारी आणि व्याजदरात झालेली वाढ, याने मध्यमवर्गाला करोनाचा मोठा फटका बसला.”

हेही वाचा : नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण .. वाद नको रे बुवा

भारताची संपत्ती काही उद्योगपतींच्या हातात आहे, असा सवाल राहुल गांधींनी राजन यांना विचारला. त्यावर राजन यांनी म्हटलं, “आपण भांडवलशाहीच्या विरोधात असू शकत नाही. पण, स्पर्धेसाठी सर्वांना लढावे लागणार आहे. आपण, मक्तेदारीच्या विरोधात असलं पाहिजे,” असं रघुराम राजन यांनी स्पष्ट केलं.

Story img Loader