दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स पाठवले आहे. अबकारी कर धोरणासंदर्भात त्यांची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, चौकशीसाठी गेल्यानंतर केजरीवाल यांना अटक केली जाणार असून भाजपा दिल्लीतील सरकार पाडण्याच्या तयारीत आहे, असा दावा आपकडून केला जात आहे. दरम्यान, केजरीवाल यांना अटक झालीच तर भविष्यात दिल्लीचे मुख्यमंत्रीपद कोण सांभाळणार, आपचे नेतृत्व कोण करणार? यावर पक्षात खल सुरू आहे. त्यासाठी आपच्या महत्त्वाच्या नेत्यांची एक बैठक पार पडली.
“दिल्लीतील सरकार उलथवून लावण्याचा भाजपाचा प्रयत्न”
मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत मंत्री गोपाल राय, मंत्री आतिशी, सौरभ भारद्वाज, दिलीप पांडे, संदीप पाठक यांच्यासह पक्षातील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. “दिल्लीमधील आप सरकार उलथवून टाकण्यासाठी कट रचला जातोय. अरविंद केजरीवाल यांना अटक होईल, असा दावा भाजपाचे नेते सोमवारपासून करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आपचे नेते मनिष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळल्यापासून हा दावा केला जातोय,” असा आरोप आपच्या नेत्यांकडून केला जातोय.
आपचे अनेक नेते तुरुंगात
केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई झालीच तर आपचे नेतृत्व कोणाकडे सोपवावे यावर आपमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. मंगळवारी (३१ ऑक्टोबर) झालेल्या बैठकीत याच विषयावर चर्चा झाली. मात्र केजरीवाल यांची जागा अन्य नेत्याला देणे सोपे नाही. कारण मनिष सिसोदिया हे केजरीवाल यांच्यानंतर सर्वांत महत्त्वाचे नेते मानले जातात. मात्र याच कथित अबकारी घोटाळ्याच्या आरोपांत ते तुरुंगात आहेत. त्यानंतर खासदार संजय सिंहही याच प्रकरणात तुरुंगात आहेत. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन सध्या जामिनावर आहेत. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. त्यामुळे केजरीवाल यांना अटक झाल्यास आपचे नेतृत्व कोणाकडे सोपवावे हा गंभीर प्रश्न आपसमोर आहे.
या आधी संजय सिंह, गोपाल राय यांच्या नावाची झाली होती चर्चा
या वर्षाच्या एप्रिल महिन्यात सीबीआयने केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले होते. तेव्हादेखील केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई होईल, असा दावा केला जात होता. केजरीवाल यांना अटक झालीच पक्षाचे नेतृत्व आणि मुख्यमंत्रीपदाचा कारभार संजय सिंह आणि गोपाल राय या नेत्यांकडे सोपवावा असा विचार तेव्हा पक्षाने केला होता. आता केजरीवाल यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे यावेळीदेखील राय यांचे नाव घेतले जात आहे. यासह राम निवास गोएल यांचेही नाव यावेळी चर्चेत आहे.
अनेक नेत्यांची नावे चर्चेत
आपमध्ये सुरू असलेल्या या चर्चेवर या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. “अंतिम निर्णय हे अरविंद केजरीवाल हेच घेतील. या जबाबदारीसाठी अनेक नेत्यांची नावे समोर येत आहेत. ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाण्याआधी अनेक बाबींवर निर्णय घ्यावा लागणार आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही,” असे या पक्षाच्या नेत्याने म्हटले.
आमदारांना एकसंध ठेवण्याचे आव्हान
आपपुढे सध्या दिल्ली सरकार कोण सांभाळणार हा तेवढा गंभीर मुद्दा नाही. कारण सध्या अरविंद केजरीवाल यांच्याकडे कोणत्याही खात्याची जबाबदारी नाही. केजरीवाल यांना अटक झालीच तर आप पक्षाला एकसंध कोण ठेवणार? हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण दिल्लीमध्ये ७० पैकी ६२ आमदार हे आपचे आहेत. यामध्ये काही आमदार हे सलग तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत.. यातील काही आमदार हे काँग्रेस आणि भाजपा या पक्षातील आहेत. त्यामुळे या सर्व आमदारांना एकत्र ठेवणे हे पक्षापुढे आव्हान असणार आहे.
“अनुभवी नेता निवडणे गरजेचे”
“केजरीवाल यांना अटक झालीच तर पक्षापुढे हे सर्वांत मोठे आव्हान असणार आहे. पक्षाची स्थापना झाल्यापासून जी व्यक्ती पक्षासोबत आहे, त्याच्याकडेच ही जबाबदारी सोपवण्याला प्राधान्य दिले जाईल. कारण त्या नेत्यावर अन्य नेते आणि आमदार विश्वास ठेवू शकतील. या पदासाठी एक अनुभवी आणि खाचखळगे माहीत असलेला नेत्याची निवड करणे गरजेचे आहे,” असे आप पक्षातील सूत्रांनी सांगितले.
राजस्थान, मध्य प्रदेशची निवडणूक लढवण्याचा निर्णय
दरम्यान, सध्या राजस्थान, तेलंगणा, मिझोरम, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांत विधानसभा निवडणूक होत आहे. यातील राजस्थान, मध्य प्रदेश अशा राज्यांत आपने आपले उमेदवार उभे केले आहेत. असे असतानाच केजरीवाल यांना ईडीने समन्स बजावले आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई झालीच तर आम आदमी पार्टी आगामी काळात नेमके काय करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.