नवी मुंबई : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या निमीत्ताने राज्यातील समाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या निमीत्ताने ठाणे, रायगड जिल्ह्याच्या गावागावांमधून ओबीसी एकत्रिकरणासाठी सुरु झालेल्या प्रयत्नांची चर्चा पुन्हा एकदा येथील राजकीय वर्तुळात जोर धरु लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या तरी केंद्र शासनाच्या स्तरावरुन अजूनही नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची प्रक्रिया पुर्ण झालेली नाही. त्यामुळे ठाणे, रायगडातील आगरी-कोळी समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना आता गावागावांमध्ये जाऊन पुन्हा एकदा संघर्ष समितीच्या नेत्यांनी बैठका घेण्याचे नियोजन सुरु केले आहे. या बैठकांमध्ये विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा चर्चेला आणला जात असतानाच दुसरीकडे आगरी-कोळी समाजाला मिळालेले ओबीसीचे आरक्षण आणि सध्याच्या राजकीय, सामाजिक पार्श्वभूमीवर या आरक्षणाची चर्चा करण्याचा प्रयत्नही सुरु झाला आहे.

हेही वाचा : सचिन पायलट यांचा प्रचार अन् अशोक गहलोतांचा पाठिंबा, भाजपाच्या टीकेला उत्तर म्हणून काँग्रेसची खास रणनीती!

नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे यासाठी स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी पनवेलच्या बैठकीमध्ये राज्यात सूरु असलेल्या इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षणा संदर्भात गावोगावी जाऊन प्रबोधन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुढील काही दिवसांत ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील सर्व गावांमधील आगरी व कोळी बांधवांना एकत्र करुन ओबीसी बांधवांचे प्रबोधनासाठी मोठ्या प्रमाणात बैठका होणार आहेत. याबाबत कृती समितीचे अध्यक्षांनी याबाबत संभ्रम दूर करताना ओबीसी समाजाच्या प्रबोधनासाठी कृती समिती नव्हेतर आखील आगरी समाज परिषद सक्रीयपणे बैठका घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दि. बा. पाटील यांनी राजकारण करताना आगरी समाजाला आरक्षण मिळायला हवे यासाठी सतत आग्रह धरला होता. हे आरक्षण पुढेही टिकावे आणि त्याचे फायदेही कायम रहावेत असा दि.बांचा आग्रह होता. मराठा आरक्षणाचा मुद्दा तीव्र होत असताना मध्यंतरी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाचा मेळावा घेऊन नव्याने रणशिंग फुंकण्याचा प्रयत्न मध्यंतरी केला. भुजबळ यांच्या मेळाव्यात आगरी-कोळी समाजाचा कितपत सहभाग होता याविषयी मात्र प्रश्नचिन्ह व्यक्त केले जात आहे. असे असताना ठाणे आणि रायगड समाजातील आगरी, कोळी समाजाचे आरक्षणासंबंधी प्रबोधन करण्यासाठी गावागावांमध्ये प्रबोधन बैठका घेतल्या जात आहेत, अशी माहिती नवी मुंबई विमानतळ नामांतर कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी लोकसत्ताला दिली. या बैठकांमध्ये आरक्षणापेक्षा आगरी-कोळी समाजाच्या प्रबोधनावर आणि नामकरणासंबंधी पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यावर अधिक भर दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : “… तर मी राजीनामा देण्यास तयार”, जरांगे-पाटील यांच्या आंदोलनावर छगन भुजबळ यांची रोखठोक भूमिका

कृती समिती सक्रिय करण्याचा प्रयत्न

मागील दोन वर्षांपासून ठाणे व रायगड जिल्ह्यातील आगरी समाजातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला मिळावे यासाठी कृती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्षपद कळव्यातील आगरी समाजाचे नेते दशरथ पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. पाटील यांचे लहान बंधू उमेश हे कळव्यातील शिवसेनेचे ( शिंदे गट) नगरसेवक आहेत. या भागातील आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून परिचीत असणारे पाटील यांनी विमानतळ नामकरण कृती समितीच्या माध्यमातून आगरी समाजाच्या प्रबोधन बैठका घेताना रायगड आणि विशेषत: पनवेल भागातील आगरी समाजातील राजकीय नेत्यांना तसेच पदाधिकाऱ्यांनाही सोबत घेतले आहे. दरम्यान ही समिती कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या वर्चस्वाची नसून त्यामध्ये सर्वच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहेत. सोमवारी कृती समितीची बैठक पार पडल्यानंतर त्याच सभागृहात आखील आगरी समाज परिषद बैठक संपल्यानंतर घेण्यात आली. दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला मिळावे हाच कृती समितीचा मुख्य उद्देश आहे. त्यापासून समिती कदापी भरकटलेली नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Efforts to integrate obc for navi mumbai airport naming the fight to give the name of db patil s to airport intensified print politics news css