दीपक महाले
जळगाव : जिल्ह्यात गुलाबी थंडीमुळे हवामानाचा पारा कमालीचा घटला असला तरी राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण मात्र चांगलेच तापले आहे. नागपूर अधिवेशनात जामनेर येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या भूखंडावर व्यापारी संकुल उभारताना घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केल्यानंतर खडसेंच्या सौभाग्यवतींच्या नावे असणाऱ्या जमिनीतून गौण खनिज उत्खननाचा विषय बाहेर काढला गेला. यात ४०० कोटींचा घोटाळा झाल्याची तक्रार मुक्ताईनगरचे आमदार आणि खडसेंचे कट्टर विरोधक चंद्रकांत पाटील यांनी केली. आता या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जाणार आहे. सत्ताधारी गटाने खडसेंची सर्व प्रकारे कोंडी करण्याची व्यूहरचना आखल्याचे दिसत आहे.
नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंच्या सौभाग्यवतींच्या नावे असणार्या ३३ हेक्टर ४१ आर जमिनीवरून गौण खनिजाचे उत्खनन करीत तब्बल ४०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. त्या संदर्भातील पेनड्राइव्हसह ड्रोन चित्रीकरण व अन्य ध्वनिचित्रफितीचे पुरावे असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. स्थानिक राजकारणात खडसे आणि पाटील यांच्यातील वैर जिल्हावासियांना ज्ञात आहे. पाटील हे २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत खडसेंची कन्या रोहिणी खडसे यांना पराभूत करीत निवडून आले होते. अलीकडेच झालेल्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतही राजकीय पटलावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्याची स्पर्धा लागली होती. कथित गैरव्यवहाराच्या संदर्भात पोलीस दप्तरी तक्रारी झाल्या. काही प्रकरणात गुन्हा दाखल झाला. दूध संघात खडसे गट पराभूत झाला असला तरी जिल्ह्याच्या राजकारणातून त्यांची सद्दी संपविण्यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे.
हेही वाचा: सोलापूरात आमदारकीसाठी काही पण….
अधिवेशनात मुक्ताईनगरमधील अवैध धंद्यांसह गौण खनिज उत्खननाचा आरोप हा त्याचाच एक भाग म्हणता येईल. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून खडसेंना घेरण्याची एकही संधी सोडली जात नाही. आताही चंद्रकांत पाटील यांनी लक्षवेधीद्वारे खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावे असणार्या जमिनीतून गौण खनिजाचे उत्खनन होत असल्याचा विषय मांडला. मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड शिवारातील ही जागा मंदाकिनी खडसेंच्या नावे आहे. शालेय प्रयोजनासाठी ही जागा बिनशेती परवाना करण्यात आली. जानेवारी २०१९ मध्ये आधीच बिनशेती परवाना झालेल्या शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी अर्ज देण्यात आला. प्रांताधिकार्यांनीही काही दिवसांतच त्यास तत्काळ परवानगी दिली.
हेही वाचा: अधिवेशनात घोषणा आणि निदर्शनाचा स्तर खालावतोय !
महसूल खात्याच्या आशीर्वादाने शालेय प्रयोजनासाठी असलेल्या या जागेला पुन्हा कृषक करण्यात आले. त्या जमिनीवरूनच अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. १० हजार ब्रासच्या उत्खननाची परवानगी असताना तेथून लाखो ब्रास मुरुमासह अन्य गौण खनिजाचे उत्खनन झाले. या माध्यमातून तब्बल ४०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप पाटील यांनी विधानसभेत केला. या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यासंदर्भात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महसूल खात्याच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा केली. तसेच त्यांनी एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आश्वासनही दिले आहे.
जामनेरमधील कथित घोटाळ्यावर खडसेंचे प्रश्न
जामनेर येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या भूखंडावर बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे. या बांधकामात घोटाळा झाल्याबाबतची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विजय पाटील यांनी २०२१ मध्ये शासनाकडे केली होती. या संदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय समोर आले, त्या अनुषंगाने संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली, कारवाई केली नसल्यास विलंबाची कारणे काय, असे प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केले होते. त्यावर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले.जामनेर येथे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या भूखंडावरील व्यापारी संकुलाबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने शासनाने चौकशी समिती स्थापन केलेलीआहे. या चौकशी समितीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याचे म्हटले आहे. महाजन यांना शह देण्याचे धोरण खडसेंनी ठेवले आहे.
हेही वाचा: वादग्रस्त कालीचरण महाराज आहेत तरी कोण?
एसआयटी नेमल्याने काही फरक पडत नाही. जे केलेले नाही, त्यात कुठल्याही यंत्रणेमार्फत चौकशी करा, जी वस्तुस्थिती आहे, ती समोर येईलच, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. निव्वळ राजकीय उद्देशाने बदनामी करण्यासाठी सभागृहाचा वापर करणे योग्य नाही. सभागृहातील चर्चेची पातळी खाली चालली आहे. एकमेकांचे व्यक्तिगत उट्टे काढण्यासाठी, सूडबुद्धीने काही निर्णय होत आहेत. तू माझ्या चौकशीची मागणी केली, मी तुझ्या चौकशीची मागणी करतो. अशा पद्धतीचे राजकारण सुरू असल्याचे खडसेंनी म्हटले आहे.