जळगाव – राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी काही महिने जोरकस प्रयत्न करुनही यश न आल्याने आमदार एकनाथ खडसे यांनी तो प्रयत्न सोडून राष्ट्रवादीतच (शरद पवार) राहण्याचा निर्णय घेतल्यावर महाविकास आघाडीने विरोधकांना तोंड देण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर विधानसभा निवडणुकीत टाकली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे खडसे यांनी आता राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्याशी बिनसल्यानंतर खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर संधी देत आमदार केले. परंतु, त्यानंतरही खडसे यांचे भाजपमध्ये परतण्याचे वेध कायम राहिले. लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी मुंबईत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेतली होती. आपण भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचा दावा त्यांनी तेव्हा केला असताना भाजपकडून कोणत्याच पदाधिकाऱ्याने त्यास दुजोरा दिला नाही. रावेर लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार स्नुषा रक्षा खडसे यांचा प्रचारही त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीतच (शरद पवार) राहणार असल्याचे जाहीर केले.

हेही वाचा >>> Constituencies In Yavatmal : स्थानिक मुद्यांसह जातीय समीकरणे निर्णायक, यवतमाळमधील सातही मतदारसंघात चुरस

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून (शरद पवार) उमेदवारी मिळाली आहे. याशिवाय जळगाव ग्रामीण, एरंडोल-पारोळा आणि जामनेरमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. शरद पवार गटाच्या चारही मतदारसंघांवर लक्ष ठेवण्यासह तेथील उमेदवारांसाठी सभा घेण्याचा प्रयत्न एकनाथ खडसे यांनी केला. याशिवाय महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या उमेदवारांचा प्रचारही त्यांनी केला. तब्येतीच्या कारणावरून फार दगदग सहन होत नसल्याने पुढील निवडणूक मी पाहणार की नाही, ते परमेश्वर ठरवेल, असे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. यापुढील काळात कोणतीच निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse likely to announces retirement from electoral politics print politics news zws