मुंबई : तीन दशके भाजपात काढलेले व उत्तर महाराष्ट्रातील बडे राजकारणी प्रस्थ एकनाथ खडसे उर्फ नाथाभाऊ यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला गाफील ठेवत ऐनवेळी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीने खडसे यांच्यासाठी रावेर लोकसभा मतदारसंघ राखून ठेवला होता. मात्र, सुनेला भाजपमधून उमेदवारी निश्चित होताच नाथा भाऊंनी डॉक्टरांचा हवाला देत लढण्यास नकार देत भाजपची वाट धरली आहे. नाथा भाऊंच्या या खेळीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संतापल्याचे समजते.
या लोकसभेला राष्ट्रवादी १० जागा लढवत आहे. पैकी उत्तर महाराष्ट्रात रावेर एक आहे. दोन महिन्यापूर्वी खडसे यांनी शरद पवार यांना भेटून ‘आपण रावेर लढतो’ असा शब्द दिला होता. त्याच दरम्यान खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होत्या. भाजपने त्यांना उमेदवारीही जाहीर केली.
हेही वाचा…अशोक चव्हाणांच्या मंत्रिपदासाठी मतदारांना भावनिक साद!
‘निवडणूक लढवायची नाही’ असा सल्ला डॉक्टरांनी आपल्याला दिल्याचे खडसे यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत सांगितले. खडसे यांच्यावर भरवसा ठेवून असलेल्या राष्ट्रवादीने ऐनवेळी उमेदवारांची शोधाशोध सुरु केली. त्यादरम्यान खडसे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेशासाठी दिल्लीवाऱ्या सुरु केल्या. खडसे यांचे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचे ठरले असताना त्यांच्या कन्या रोहिणी मात्र राष्ट्रवादीतच थांबलेल्या आहेत.
यासंदर्भात राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील म्हणाले, काहीही करुन आपल्याच घरात रावेरची खासदारकी राहावी, अशी नाथाभाऊंची खेळी होती. सुनेला भाजपकडून उमेदवारी मिळाली नसती तरच ते राष्ट्रवादीतून लढणार होते. खडसे यांनी शरद पवार यांना रावेरच्या उमेदवारीसाठी शेवटपर्यंत झुलवत ठेवले, त्यामुळे आमचा उमेदवार निवडीचा विचका झाला, असा दावा ॲड. पाटील यांनी केला.
हेही वाचा…अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
‘मविआ’ सरकारने राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे राज्यपाल नामनियुक्त आमदार निवडीसाठी १२ नेत्यांची शिफारस केली होती. त्यात खडसे यांच्या नावाला कोश्यारींचा आक्षेप होता. खडसे यांच्यामुळे ती यादी नामंजूर झाली, असा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा दावा आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने खडसेंना विधान परिषद दिली. परिषदेचे गटनेते पद बहाल केले. भाजपमधून अडीच वर्षापूर्वी राष्ट्रवादीत दाखल झालेल्या खडसे यांन सर्व काही देवूनही पक्षाचा ऐनवेळी घात केल्याबद्दल खडसे यांच्याविषयी शरद पवार गटात सध्या संतापाची भावना आहे.